राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या देखरेखीखाली रशियात ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’ची सुरुवात

मॉस्को/किव्ह – रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता वाढत असतानाच राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या देखरेखीखाली रशियात ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’ना सुरुवात झाली. सरावाच्या पहिल्या टप्प्यात रशियाच्या ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर फोर्सेस’नी आर्क्टिक क्षेत्र, उत्तर रशिया तसेच अतिपूर्वेकडील क्षेत्रातून आंतरखंडीय तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी दिली. रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेनंतर प्रथमच ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’ आयोजित करण्यात आल्या होत्या.

पुतिन यांच्या देखरेखीखाली

रशिया-युक्रेन युद्धाला जवळपास आठ महिने पूर्ण झाले असून या काळात रशियाने युक्रेनच्या चार प्रांतांवर ताबा मिळविण्यात यश मिळविले आहे. यात लुहान्स्क, डोनेत्स्क, झॅपोरिझिआ व खेर्सन यांचा समावेश होतो. हे प्रांत रशियाने आपल्यात विलिन करून घेतले असून त्याच्या सुरक्षेसाठी सर्व उपलब्ध यंत्रणांचा वापर करेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला होता. हा इशारा देतानाच पुतिन यांनी अणुहल्ल्याचा उल्लेख करून आपली धमकी पोकळ समजू नका असेही बजावले होते. पुतिन यांच्या या वक्तव्यानंतर रशिया युक्रेनवर अणुहल्ला करणार असल्याचे दावे पाश्चिमात्यांकडून करण्यात येत होते. यावरून अमेरिका व नाटोने रशियाला गंभीर परिणामांचे इशारेही दिले होते.

पुतिन यांच्या देखरेखीखाली

रशियाकडून होणाऱ्या अणुहल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नाटोनेही उत्तर युरोपात ‘न्यूक्लिअर एक्सरसाईज’ सुरू केला होता. नाटोचा हा सराव 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. याच दरम्यान रशियाने ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’चे आयोजन करून आपले सामर्थ्य दाखवून दिल्याचे मानले जाते. बुधवारी झालेल्या ड्रिल्सदरम्यान रशियाने ‘यार्स’ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र तसेच ‘सिनेवा’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अतिपूर्वेकडील कॅमचॅट्का प्रांतातूनही काही क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आले, मात्र त्यातील क्षेपणास्त्रांची माहिती देण्यात आलेली नाही. रशियाच्या ‘टीयू-95 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स’नीही क्षेपणास्त्रहल्ल्याचा सराव केला.

पुतिन यांच्या देखरेखीखाली

शत्रूदेशाने अणुहल्ला चढविल्यास त्याला रशियन ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस’नी दिलेले प्रत्युत्तर असे सरावाचे स्वरुप होते, असे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी सांगितले. सरावादरम्यान सर्व नियोजित उद्दिष्टे पूर्ण झाल्याचेही संरक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आले. युक्रेनमधील लष्करी मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर रशियाने ‘सरमात’ या प्रगत अण्वस्त्राची चाचणी केली होती. त्यानंतर या अण्वस्त्राचे उत्पादन सुरू झाले असून वर्षअखेरपर्यंत हे क्षेपणास्त्र रशियन संरक्षणदलांमध्ये सामील करून घेण्यात येईल, असे जाहीर केले होते.

दरम्यान, रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हवर हवाईहल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये किव्हमधील अनेक इमारती व पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. किव्हव्यतिरिक्त झॅपोरिझिआमधील युक्रेनच्या जागांवरही रशियाकडून हल्ले चढविण्यात आल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. डोन्बासमधील बाखमत शहरासाठी सुरू असलेला संघर्ष अधिक प्रखर झाला असून रशियन फौजांच्या हल्ल्यांपुढे टीकाव धरणे कठीण जात असल्याची कबुली युक्रेनकडून देण्यात आली. त्याचवेळी खेर्सनमध्ये रशियाने वाढविलेली तैनाती व इतर कारणांमुळे प्रतिहल्ल्यांचा वेग मंदावल्याचेही युक्रेनकडून सांगण्यात आले.

मराठी    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info