तिसरे महायुद्ध सुरू झालेले आहे

- विख्यात अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी

तिसरे महायुद्ध सुरू झालेले आहे

बर्लिन, दि. २ (वृत्तसंस्था) – ‘इराण आणि इस्रायलची कधीही टक्कर होऊ शकते. युक्रेनच्या युद्धात नाटोच्या सहभागाची शक्यता बळावली आहे. तर चीन तैवानवर आज की उद्या हल्ला चढविल, याची बायडेन प्रशासन उत्कंठेने प्रतिक्षा करीत आहे. हे पाहिले तर तिसरे महायुद्ध सुरू झालेले आहे, हे प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. युक्रेनमध्ये आणि सायबर क्षेत्रात तर हे युद्ध प्रत्यक्ष लढले जात आहे’, असा इशारा विख्यात अर्थतज्ज्ञ नॉरियल रुबिनी यांनी दिला. त्याचवेळी भयंकर महागाई, तीव्र आर्थिक मंदी व कमालीची बेरोजगारी अशा संकटांचा जगाला सामना करावा लागेल असे सांगून रुबिनी यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचे ‘क्रॅश लँडिंग’ होईल, असे बजावले आहे.

२००८ साली आलेल्या आर्थिक मंदीच्या संकटाची फार आधीच जगाला जाणीव करून देणारे अर्थतज्ज्ञ अशी नॉरियल रुबिनी यांची ओळख आहे. यामुळेच त्यांना वॉल स्ट्रीटचे डॉक्टर डूम म्हणून ओळखले जाते. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असलेल्या नॉरियल रुबिनी यांचे ‘मेगाथ्रेटस्‌‍: टेन डेेंजरस ट्रेन्डस्‌‍ दॅट इंपिरियल अवर फ्युचर अँड हाऊ टू सर्व्हायव्ह देम’ नावाचे पुस्तक प्रकाशित गेल्याच महिन्यात झाले. यात त्यांनी जगाला संभवणाऱ्या धोक्यांची जाणीव करून दिली असून या निमित्ताने ते माध्यमांना मुलाखती देत आहेत. जर्मनीच्या ‘देर स्पिगल’ नावाच्या ख्यातनाम साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत रुबिनी यांनी तिसरे महायुद्ध सुरू असल्याची जाणीव जगाला परखड शब्दात करून दिली.

युक्रेनमध्ये तसेच सायबर क्षेत्रात प्रत्यक्ष युद्ध सुरू आहेच. याच्या बरोबरीने इराण व इस्रायल यांच्यात कुठल्याही क्षणी टक्कर होईल आणि घनघोर संघर्ष उद्भवेल, असा इशारा नॉरियल रुबिनी दिला. इतकेच नाही तर चीन तैवानवर कधी हल्ला चढविल, याची बायडेन प्रशासन मोठ्या उत्कंठेने वाट पाहत असल्याचा दावा रुबिनी यांनी केला. याचे कारणही रुबिनी यांनी या मुलाखतीत दिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर केल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर्सच्या पुरवठ्यापैकी ५० टक्के सेमीकंडक्टर्स तैवानमध्येच तयार केले जातात. यापैकी ८० टक्के सेमीकंडक्टर्स अतिप्रगत श्रेणीतले आहेत. तैवानमध्ये असलेले हे सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीचे केंद्र अमेरिकेला आपल्या देशात उभारायचे आहे. यासाठी अमेरिका तैवानवरील चीनच्या हल्ल्याची प्रतिक्षा करीत असल्याचा निष्कर्ष नॉरियल रुबिनी यांनी नोंदविला.

तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनला जलदगतीने लष्करी हालचाली कराव्या लागतील. अन्यथा रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याप्रमाणे हे युद्ध लांबेल आणि चीनला ते परवडणार नाही. याची जाणीवही चीनला झालेली आहे, असा दावा रुबिनी यांनी केला. इतकेच नाही, तर आर्थिक आघाडीवर जगासमोर भीषण संकट खडे ठाकलेले आहे. हे संकट १९७० दशकातील मंदीसारखे असेल तर ती भाग्याची बाब ठरेल. पण ही आर्थिक मंदी १९४० सालच्या महायुद्धाकडे घेऊन जाणारी ठरली, तर धडगत नाही, असे एका विश्लेषकाने केलेल्या विधानांचा दाखलाही नॉरियल रुबिनी यांनी या मुलाखतीत दिला.

युक्रेनचे युद्ध आणि तैवानचा धक्का या जगाला सहन कराव्या लागणाऱ्या अनेक हादऱ्यांपैकी एकदोन गोष्टी ठरतात. रशिया आणि युक्रेनचे युद्ध, इराण आणि इस्रायल किंवा चीनपर्यंत पोहोचण्याच्या आधीच वेगाने हालचाली केल्या नाहीत, तर परिस्थिती अधिकच गंभीर बनेल, असे रुबिनी पुढे म्हणाले. याबरोबरच धोरणकर्त्यांनी स्टॅगफ्लेशन टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करायला हवी, याकडेही नॉरियल रुबिनी यांनी लक्ष वेधले. एकाच वेळी मंदावलेला विकासदर, महागाई व बेरोजगारी या साऱ्या समस्या एकाच वेळी टोकाला जातात, त्याला स्टॅगफ्लेशन म्हटले जाते. जग लवकरच भयंकर समस्येचा सामना करील. अशा स्थितीत जगभरातील देशांना निर्णय घेणे अतिशय अवघड जाईल. कारण महागाई रोखण्यासाठी व्याजदारात वाढ करावी लागेल. तर मंदीचे धोके टाळण्यासाठी व्याजदरात कपात करावी लागेल. त्यामुळे कुठलाही निर्णय घेतला किंवा घेतला नाही, तरी अनर्थ अटळ असेल. म्हणूनच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे विमान ‘हार्ड लँडिंग’ करणार असल्याचे सांगून याचे धक्के सर्वांना सहन करावे लागतील, असा इशारा नॉरियल रुबिनी यांनी दिला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info