पाश्चिमात्यांनी युक्रेनच्या जनतेला भट्टीत झोकून दिले आहे -रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

पाश्चिमात्यांनी युक्रेनच्या जनतेला भट्टीत झोकून दिले आहे -रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को/किव्हयुक्रेन – राजधानी किव्हसह सात शहरांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात येईल, अशी घोषणा युक्रेनच्या यंत्रणांनी केली. शनिवारच्या सकाळी रशियाने युक्रेनच्या ऊर्जाक्षेत्राशी निगडित सुविधांवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचे घणाघाती हल्ले चढविले होते. त्यानंतर युक्रेनी यंत्रणांना ब्लॅकआऊटची ही घोषणा करणे भाग पडले. रशिया व रशियन जनतेच्या विरोधात विद्वेष पसरविण्याची फार मोठी किंमत युक्रेन व युक्रेनच्या जनतेला सहन करावी लागत आहे. याला युक्रेनची राजवट व त्यामागे असलेले पाश्चिमात्य जबाबदार आहेत. त्यांनी युक्रेनच्या जनतेला भट्टीत झोकून दिले आहे, अशी टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली.क्षेपणास्त्रे व ड्रोन्सद्वारे रशिया युक्रेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत आहे. यामुळे युक्रेनी जनतेला पाणी व विजेसारख्या मुलभूत सुविधा मिळणे अवघड होऊन बसल्याचा दावा केला जातो. मात्र युक्रेनी लष्कराने रशियात घातपात माजविण्याची किंमत युक्रेनला मोजावीच लागेल, असे इशारा रशिया देत आहे. त्याचवेळी युक्रेनी जनतेशी आपले वैर नाही, केवळ युक्रेनच्या राजवटीने स्वीकारलेल्या रशियाविरोधी धोरणांमुळे हा संघर्ष पेटला आहे, असा दावा रशियाकडून केला जातो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देखील पुन्हा एकदा रशियाच्या विरोधात पसरविण्यात आलेल्या विद्वेषाची फार मोठी किंमत युक्रेन व युक्रेनी जनतेला मोजावी लागत असल्याचे म्हटले आहे.हा संघर्ष पेटवून देणाऱ्यांनी युक्रेनच्या जनतेला अशारीतीने भट्टीत झोकून दिले आहे की जणू युक्रेनमध्ये कुणी अस्तित्त्वातच नाही, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनला चिथावणी देणाऱ्या अमेरिकेवर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र रशियन जनतेमध्ये युक्रेनी जनतेबाबत कधीही द्वेषभाव नव्हता, उलट रशियन जनता युक्रेनच्या जनतेचा आदरच करीत आली आहे. आजही रशियन जनतेमधील युक्रेनबाबतची ही प्रेम आणि आदराची भावना कायम आहे. सध्या युक्रेनबरोबर सुरू असलेला रशियाचा संघर्षदेखील काहीजणांनी जाणीवपूर्वक पेटवून दिला आहे, असा घणाघाती हल्ला पुतिन यांनी चढविला.दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोदोमिर झेलेन्स्की यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी युक्रेनला अमेरिकेचा संपूर्णपणे पाठिंबा असेल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबरच अमेरिकेने युक्रेनी लष्करासाठी आणखी 40 कोटी डॉलर्सचे सहाय्य घोषित केले. यानुसार युक्रेनच्या लष्कराला अमेरिकेकडून टी-72 रणगाडे, हॉक अँटी-एअर क्षेपणास्त्रे आणि 250 ‘एम1117’ सशस्त्र वाहने, 40 आर्म्ड रिव्हरिंग बोटस्‌‍, 1100 घोस्ट कामिकाझी ड्रोन्स यांचा पुरवठा केला जाणार आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info