अंकारा/मॉस्को – अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी, युक्रेनमधील अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराबाबत रशियाला गंभीर इशारा दिला आहे. रशियाने अण्वस्त्रांचा वापर केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील व सामरिक स्थैर्य धोक्यात येईल, असे बर्न्स यांनी बजावल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनीही रशियाला अण्वस्त्रांच्या मुद्यावर फटकारले होते. मात्र रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर समोरासमोर झालेल्या चर्चेत अमेरिकेने असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
सोमवारी तुर्कीत रशिया व अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांची भेट झाली. रशियाची गुप्तचर यंत्रणा ‘एसव्हीआर’चे प्रमुख सर्जेई नॅरिश्किन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी तुर्कीला भेट दिल्याचे ‘कॉमरसॅन्ट’ या रशियन दैनिकाने आपल्या वृत्तात स्पष्ट केले. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्यांनीही ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तुर्कीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
‘अमेरिकेने आण्विक धोके व सामरिक स्थैर्याच्या मुद्यावर रशियाशी संवाद साधण्याचे मार्ग अजूनही खुले ठेवलेले आहेत व ही गोष्ट कधीही नाकारलेली नाही. त्याचाच भाग म्हणून सीआयएचे प्रमुख रशियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांची अंकारात भेट घेणार आहेत’, असे नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्यांनी भेटीपूर्वी सांगितले होते. त्यानंतर आता व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सीआयए प्रमुखांची भेट अण्वस्त्रांच्या मुद्यावरून होती, असे म्हटले आहे.
‘बर्न्स कोणत्याही प्र्रकारच्या वाटाघाटींसाठी गेलेले नाहीत. युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासंदर्भात कोणतीही बोलणी झालेली नाहीत. रशियाला अण्वस्त्रांच्या मुद्यावर इशारा देण्यासाठी ही भेट होती. रशियाने युक्रेनवर असा हल्ला चढविल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. सामरिक स्थैर्यालाही धोका निर्माण होईल, असे बजावण्यात आले’, असा दावा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी केला. सीआयएने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी, रशिया व अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांची तुर्कीत भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून अधिक माहिती देण्याचे टाळले.
सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रशियाला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी बर्न्स यांनी रशियाला युक्रेनवरील हल्ल्याची योजना अमेरिकेला माहित असून त्याला योग्य प्रत्युत्तर मिळेल, असे बजावले होते. त्यानंतर बर्न्स यांनी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यात युक्रेनने रशियाबरोबरील वाटाघाटींची संधी साधावी, असा सल्ला दिल्याचे समोर आले होते. यावर युक्रेनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यापूर्वी अमेरिकेकडून युक्रेनवर शांतीचर्चेसाठी दबाव येत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिका व रशियाच्या गुप्तचर प्रमुखांची तुर्कीतील भेट लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.
दरम्यान, मंगळवारी रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह खार्किव्ह व इतर शहरांमध्ये मोठे क्षेपणास्त्रहल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |