रशिया-युक्रेन युद्धाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून अण्वस्त्रसज्जतेचा इशारा

मॉस्को – २४ फेब्रुवारीला रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीला रशियाच्या आण्विक सज्जतेची जाणीव करून दिली. रशिया आपले ‘न्यूक्लिअर ट्रायड’ अधिक बळकट करण्यावर भर देईल व ‘सरमात’ हे अण्वस्त्र येत्या काही महिन्यात रशियन संरक्षणदलात तैनात करण्यात येईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. रशिया आपल्या नौदलात तीन आण्विक पाणबुड्याही सामील करणार असल्याकडेही पुतिन यांनी लक्ष वेधले. बुधवारी रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी अणुहल्ल्यावरून इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आण्विक सज्जतेबाबत केलेली विधाने अणुयुद्धाबाबत रशियाकडून दिले जाणारे इशारे पोकळ नसल्याचे दाखवून देत आहे.

रशिया-युक्रेन

आजवर कुठलाही अण्वस्त्रधारी देश मोठ्या युद्धात पराभूत झालेला नाही. आजच्या घडीला रशिया आपल्या अस्तित्त्वासाठी युद्ध करीत आहे आणि या युद्धात पराभवाचा पर्याय रशियासमोर असूच शकत नाही, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी रशियावर पराभव लादण्याचा प्रयत्न झालाच, तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करताना कचरणार नाही, असे बजावले होते. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा रशियाच्या अण्वस्त्रसज्जतेचा उल्लेख करून पाश्चिमात्य आघाडीला संदेश दिला आहे.

रशिया-युक्रेन

युक्रेनमधील लष्करी मोहिमेला वर्ष होण्यापूर्वी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, ‘डिफेन्डर ऑफ द फादरलॅण्ड हॉलिडे’च्या निमित्ताने राष्ट्राला संबोधून भाषण केले. या भाषणात पुतिन यांनी, रशियाच्या अण्वस्त्रसज्जतेसह लष्करी क्षमता वाढविण्याच्या मुद्यावर भर दिला. ‘रशिया आपले न्यूक्लिअर ट्रायड अधिक बळकट करण्यावर भर देईल. रशिया लवकरच सरमात हे आंतरखंडीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षणदलात तैनात करणार आहे. काही दिवसांपूर्वी बोरेई प्रवर्गातील एम्परर अलेक्झांडर थ्री ही आण्विक पाणबुडी नौदलात सामील झाली आहे. येत्या काही वर्षात अशा तीन आण्विक पाणबुड्या नौदलात सामील होतील’, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले.

रशिया-युक्रेन

यावेळी पुतिन यांनी रशियाच्या संरक्षणदलांमध्ये अधिक प्रगत शस्त्रास्त्रे व यंत्रणा सामील करून घेतल्या जातील, असा दावाही केला. ‘किन्झाल’ व ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले असून ही क्षेपणास्त्रे लवकरात लवकर संरक्षणदलांना देण्यात येतील, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

दरम्यान, ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी रशिया-युक्रेन युद्ध अजून वर्षभर सुरू राहिल, असे बजावले आहे. रशियाने मर्यादा ओलांडल्या असून मोठी जीवितहानी होत असतानाही नवी तैनाती सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन थांबतील, अशी चिन्हे दिसत नाहीत या शब्दात वॉलेस यांनी युद्ध लांबण्याचे संकेत दिले. तर रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री मिखाईल गॅलुझिन यांनी, पाश्चिमात्य देश (अँग्लो-सॅक्सन्स) युक्रेन संघर्ष अधिकाधिक रक्तरंजित व्हावा यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत, असा इशारा दिला.

युक्रेन सीमेनजिक रशियाचे लढाऊ विमान कोसळले 

युक्रेनमधील मोहीम पूर्ण करून माघारी येणारे सुखोई-२५ हे रशियन लढाऊ विमान रशियन हद्दीत कोसळल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. पश्चिम रशियातील व्हॅल्युस्की डिस्ट्रिक्टमध्ये विमान दुर्घटनाग्रस्त होऊन वैमानिकाचा मृत्यू झाल्याचेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. काही माध्यमांनी युक्रेनने विमान उडविल्याचा दावा केला होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी युक्रेनने रशियन हद्दीतील हवाईतळांवर हल्ले चढवून रशियन लढाऊ विमानांचे नुकसान केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरते.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info