झॅपोरिझिआ/मॉस्को – दक्षिण युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्पात झालेल्या हल्ल्यांवरून रशिया व युक्रेनमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. प्रकल्पावरील हल्ले रशियाच करीत असून हा न्यूक्लिअर ब्लॅकमेलचा भाग असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर रशियाने, युक्रेनला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांना जबाबदार धरीत या देशांनी युक्रेनला समज द्यावी असे आवाहन केले. गेले दोन दिवस अणुप्रकल्पाच्या परिसरात हल्ले सुरू असून सदर प्रकल्पाला धोका निर्माण झाल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने बजावले आहे.
युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प म्हणून युक्रेनमधील झॅपोरिझिआ अणुप्रकल्प ओळखण्यात येतो. या प्रकल्पाची क्षमता जवळपास सहा हजार मेगावॅट इतकी आहे. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही दिवसातच रशियन फौजांनी या प्रकल्पावर ताबा मिळविला होता. त्यानंतर रशियाने प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात संरक्षणतैनाती केली आहे. काही महिन्यांपूर्वी रशियाच्या ताब्यातील भागांवर प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू करणाऱ्या युक्रेनी लष्कराने हा प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी ड्रोन हल्ल्यांसह विशेष घातपाती पथकेही पाठविण्यात आली होती. मात्र रशियाने प्रकल्पावरील आपला ताबा भक्कम ठेवला असून हा प्रकल्प रशियन वीजयंत्रणेला जोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रकल्प ताब्यात घेण्यात अपयश आल्याने युक्रेनकडून रशियावरच हल्ल्यांचे आरोप करण्यात येत आहेत. युक्रेनच्या आरोपांची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घेऊन या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे पथक तैनात केले आहे. मात्र त्यानंतरही हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याचे गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांमधून दिसून येत आहे. युक्रेनने यासाठी पुन्हा रशियालाच जबाबदार धरले असून ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’चा ठपकाही ठेवला आहे. मात्र रशियाने हे आरोप फेटाळून युक्रेनच कारवाया करीत असल्याचा आरोप केला. गेल्या दोन दिवसात झालेल्या हल्ल्यांमुळे प्रकल्पातील काही इमारतींचे नुकसान झाले असून काही भागात आगदेखील लागल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली. अणुभट्टीची कुलिंग सिस्टिम तसेच किरणोत्सर्गी कचऱ्याच्या साठ्याला लक्ष्य करण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या परिसरात किमान दहा मोठे स्फोट झाल्याचा दावा अणुऊर्जा आयोगाकडून करण्यात आला आहे. रशियाने सदर हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त करून युक्रेनला समर्थन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने युक्रेनची राजवट तसेच लष्कराला याबाबत समज द्यावी, असे बजावले.
‘जे कोणी प्रकल्पावर हल्ले चढवित आहेत त्यांनी ते ताबडतोब थांबवायला हवेत. अणुप्रकल्पावर हल्ले करणारे आगीशी खेळत आहेत’, असा इशारा आयोगाचे प्रमुख राफाएल ग्रॉसी यांनी दिला. अणुप्रकल्प व परिसरातून लष्कर तसेच संबंधित तैनाती तातडीने मागे घेण्याची गरज आहे, अशी मागणीही ग्रॉसी यांनी यावेळी केली.
युक्रेनी लष्कराने रशियन युद्धकैद्यांची हत्या केली – व्हिडिओ खरे असल्याचा अमेरिकी दैनिकाचा दावा
वॉशिंग्टन/मॉस्को – पूर्व युक्रेनमध्ये युक्रेनी लष्कराने रशियन युद्धकैद्यांची हत्या घडविल्यासंदर्भात प्रसिद्ध झालेले व्हिडिओ खरे असल्याचा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या दैनिकाने केला. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओज्मध्ये युक्रेनी लष्कराच्या ताब्यातील युद्धकैदी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दाखविण्यात आले आहे. रशियाने ही घटना गांभीर्याने घेतली असून आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र युक्रेनने यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.
अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या आघाडीच्या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करून व्हिडिओची पडताळणी केल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या लुहान्स्क प्रांतात ही घटना घडल्याचेही अमेरिकी दैनिकाने नमूद केले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |