मॉस्को/किव्ह – रशियाने झॅपोरिझिआ अणुप्रकल्पात रॉकेट लाँचर सिस्टिम्स तैनात केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या अणुप्रकल्पाभोवती ‘सेफ्टी झोन’ उभारण्याबाबत चर्चा सुरू होती. रशियाच्या लष्करी तुकड्या हा प्रकल्प सोडून जाण्याची तयारी करीत असल्याचे दावेही युक्रेन व पाश्चिमात्य माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर युक्रेनने केलेला नवा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी मोहिमेचे समर्थन करताना ही मोहीम यापूर्वीच हाती घ्यायला हवी होती, असे वक्तव्य केले आहे. जर्मन चॅन्सेलर मर्केल यांनी ‘मिन्स्क करारा’बाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी यासंदर्भातील उद्गार काढल्याचे सांगण्यात येते.
गेल्या काही दिवसात रशिया व युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. रशियाने युक्रेनवरील क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ले प्रखर केले आहेत. त्याचवेळी डोन्बासमधील काही भाग ताब्यात घेऊन बाखमतसारख्या शहराला वेढा घातला आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या महिन्यात खेर्सन शहरातून माघार घेतल्यानंतरही रशियन फौजांनी या शहरावरील हल्ले चालू ठेवले असून शहरातील वीजपुरवठा व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर, युक्रेनने झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणून रशियाविरोधातील वातावरण अधिक तापविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनमधील मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांनंतर रशियाने सदर अणुप्रकल्प ताब्यात घेतला होता. त्यानंतर युक्रेनने अनेकदा हा प्रकल्प ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले असले तरी ते अपयशी ठरले आहेत. अणुप्रकल्प ताब्यात घेण्यासाठी युक्रेनने ड्रोन हल्ले तसेच स्पेशल कमांडो ऑपरेशन्स राबविल्याचेही समोर आले आहे. मात्र कशातच यश मिळत नसल्याने युक्रेनने पुन्हा एकदा अणुप्रकल्पाच्या सुरक्षेबाबत बोंब मारण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
रशियन अधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात झॅपोरिझिआ अणुप्रकल्पाभोवती सेफ्टी झोन तयार करण्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती दिली होती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला होता. या प्रकल्पाभोवती होणाऱ्या हल्ल्यांची संख्याही कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वेळी युक्रेन पुन्हा एकदा ‘न्यूक्लिअर डिझास्टर’चा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अणुयुद्धाचा धोका वाढत असल्याचा इशारा दिला होता. मात्र रशिया अशा प्रकारचा हल्ला पहिला करणार नाही, असेही त्यांनी बजावले होते. या वक्तव्यानंतरही युक्रेन पुन्हा पुन्हा ‘न्यूक्लिअर डिझास्टर’चा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.
दरम्यान, व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील मोहीमेचे समर्थन करताना सदर मोहीम पूर्वीच हाती घ्यायला हवी होती, असा दावा केला आहे. जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी, 2014 साली पार पडलेला मिन्स्क करार युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याच्या योजनेचा भाग असल्याची कबुली दिली आहे. मर्केल यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सदर उद्गार आपल्यासाठी धक्कादायक असल्याचेही रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |