अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्याची ही अखेरची संधी

अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला

अब्दुल्ला, अखेरची संधी

काबुल/दोहा – ‘अफगाणिस्तानात राजकीय वाटाघाटी आणि शाश्‍वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही अखेरची संधी आहे. ही संधी वाया दवडू नका’, असे आवाहन अफगाणिस्तानचे दुसर्‍या क्रमांकाचे नेते डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केले. कतार येथील तालिबानबरोबरच्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसून त्यानंतर अब्दुल्ला यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या अपयशी बैठकीनंतर अफगाणिस्तानातील धार्मिक नेत्यांनी तालिबानला संघर्षबंदीचे आवाहन केले आहे.

तालिबानचा प्रमुख मुल्ला अखुंदझदा याने अफगाणिस्तानातील संघर्ष संपविण्यासाठी वाटाघाटीद्वारे राजकीय तोडगा काढण्याचे रविवारी जाहीर केले. पण त्याचबरोबर तालिबानच्या प्रमुखाने अफगाणिस्तानातील गनी सरकारवर ताशेरे ओढले होते. यामुळे तालिबान अफगाण सरकारबरोबर जुळवून घेण्यासाठी तयार नसल्याचे स्पष्ट झाले होते. कतारची राजधानी दोहा येथे रविवारी संपुष्टात आलेली बैठकही अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये कुठल्याही ठोस तोडग्याशिवाय पार पडली.

अब्दुल्ला, अखेरची संधी

या बैठकीनंतर अफगाण सरकार व तालिबानने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात, पुन्हा एकदा चर्चा करण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर या वाटाघाटी अधिक गतीमान केल्या जातील, असेही या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले. पण अफगाणिस्तानात संघर्षबंदी लागू करण्याबाबत तालिबानने घोषणा केली नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. कतारमधील आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही माहिती प्रसिद्ध केली. अफगाणी माध्यमांनी देखील कतारमधील बैठक अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

यानंतर राजधानी काबुलमधील धार्मिक नेत्यांनी तालिबानला आवाहन केले. येत्या काही दिवसांसाठी तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानात संघर्षबंदी लागू करावी, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. सुमारे 15 परदेशी राजनैतिक दूतावासाच्या अधिकार्‍यांनी देखील ही मागणी उचलून धरली. पण तालिबानकडून यावरही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे तालिबान संघर्षबंदीसाठी तयार नसल्याचा दावा केला जातो.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info