अणुहल्ल्यांच्या मुद्यावर अमेरिकेप्रमाणे रशियाही ‘फर्स्ट स्ट्राईक पॉलिसी’चा वापर करील

-रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

अणुहल्ल्यांच्या मुद्यावर अमेरिकेप्रमाणे रशियाही ‘फर्स्ट स्ट्राईक पॉलिसी’चा वापर करील

मॉस्को/वॉशिंग्टन, दि. 11 (वृत्तसंस्था) – अणुयुद्धाच्या धोक्यांचा विचार करता रशियाही अमेरिकेप्रमाणेच, शत्रूचा हल्ला होण्याआधीच पहिला हल्ला करण्याच्या धोरणाचा (प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक/फर्स्ट स्ट्राईक) वापर करू शकतो, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, अणुयुद्धाचा धोका सातत्याने वाढतो आहे व हा वाढता धोका नाकारणे चुकीचे ठरेल, असे बजावले होते. त्यानंतर अमेरिकेप्रमाणे धोरण स्वीकारण्याबाबत पुतिन यांनी दिलेले संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात. रशियन राष्ट्राध्यक्षांचे नवे वक्तव्य हा ‘सामरिक संदेश’ असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे.

फर्स्ट स्ट्राईककिरगिझिस्तानमध्ये झालेल्या एका बैठकीदरम्यान, पुतिन यांनी अमेरिकेच्या ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’च्या धोरणाचा संदर्भ दिला. ‘गेली अनेक वर्षे अमेरिका उघडपणे हे धोरण जगासमोर सांगत आहे. रशियानेही त्याचा वापर करण्याबाबत विचार सुरू केला आहे. शत्रूदेशांना निःशस्त्र करणाऱ्या हल्ल्याची कल्पना स्वीकारण्याचा विचार उपयुक्त ठरु शकतो. त्यांनी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोरण आधीच स्वीकारलेले आहे. आमचा प्रतिस्पर्धी जर आधीच हल्ला करण्याचे धोरण वापरु शकतो आणि आम्ही करत नसू तर सदर धोरणाचा इतर देशांमध्ये होणारा वापरही चिंतेची गोष्ट ठरते’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले.

‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक’च्या धोरणानुसार हल्ला चढविण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता रशियाकडे सज्ज आहे. रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आधीच तैनात केली असल्याकडे पुतिन यांनी लक्ष वेधले. अमेरिकेच्या क्रूझ क्षेपणास्त्रांना मागे टाकतील, अशी क्षेपणास्त्रेही रशियन संरक्षणदलांकडे असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला. रशियाचे आण्विक धोरण ‘लॉंच ऑन वॉर्निंग’ या संकल्पनेवर आधारित असल्याची जाणीवही रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी करुन दिली. ‘जर हल्ल्याचा इशारा देणाऱ्या यंत्रणेला संदेश मिळाला तर रशिया एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला करील व हा हल्ला रोखणे अशक्य ठरेल’, असा खरमरीत इशाराही पुतिन यांनी दिला. शत्रूची क्षेपणास्त्रे रशियन भूमीपर्यंत पोहोचतील खरी पण त्यानंतर शत्रूकडे त्यांचा भूभागही शिल्लक राहिलेला नसेल, अशा शब्दात रशियन राष्ट्राध्यक्षांनी ‘लॉंच ऑन वॉर्निंग’ या संकल्पनेच्या परिणामांची जाणीव करून दिली.

फर्स्ट स्ट्राईक फर्स्ट स्ट्राईक

गेल्या आठवड्यात रशियातील एका बैठकीत पुतिन यांनी अणुयुद्धाच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला हेोता. ‘रशिया कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर पहिल्यांदा करणार नाही. रशिया अण्वस्त्रसज्ज असला तरी त्याचा वापर दुसऱ्यांना धमकावण्यासाठी केला जाणार नाही. रशिया मूर्ख नाही, अण्वस्त्रे काय आहेत याची आम्हाला नीट जाणीव आहे. रशिया आपली अण्वस्त्रे जगभरात प्रदर्शित करणार नाही’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले होते. रशियाकडे जगातील प्रगत व अत्याधुनिक अण्वस्त्रे आहेत, पण आम्ही ती अमेरिकेप्रमाणे जगभरात तैनात केलेली नाहीत, हेदखील पुतिन यांनी अधोरेखित केले होते.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी रशिया आपल्या अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण व विस्तार करीत असल्याचे बजावले आहे. त्याचवेळी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष अत्यंत बेजबाबदारपणे अण्वस्त्रांबाबत वक्तव्ये करून भीती निर्माण करीत आहेत, असा दावाही ऑस्टिन यांनी केला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info