मॉस्को/किव्ह – रशियाने सोमवारी पहाटे युक्रेनची राजधानी किव्हवर मोठा ड्रोन हल्ला चढविला. या ड्रोन हल्ल्यांमध्ये वीजपुरवठा यंत्रणांसह संवेदनशील पायाभूत सुविधांशी निगडीत यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सोमवारच्या हल्ल्यात झालेले नुकसान गंभीर स्वरुपाचे असल्याची कबुली राजधानी किव्हमधील यंत्रणांनी दिली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन बेलारुसमध्ये दाखल झाले आहेत. रशिया बेलारुसच्या बाजूने युक्रेनविरोधात नवा हल्ला करण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येत आहे. अशा स्थितीत पुतिन यांची बेलारुस भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.
रशिया व युक्रेन या दोन्ही देशांमध्ये कडक हिवाळा सुरू असतानाही संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनने रशियन भागातील काही तळ तसेच इंधनसाठ्यांवर हल्ले केल्याचे समोर आले होते. या हल्ल्यांना रशियाने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी रशियाने राजधानी किव्हवर ड्रोन हल्ला केला होता. १३ इराणी ड्रोन्सचा वापर करून किव्हमधील पायाभूत सुविधा व संवेदनशील भागांना लक्ष्य केले होते.
त्यानंतर शुक्रवारी रशियन संरक्षणदलांनी युक्रेनची राजधानी किव्हसह प्रमुख शहरांवर तब्बल ७६ क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला होता. गेल्या तीन महिन्यात रशियाने इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची ही दहावी घटना ठरली. शुक्रवारच्या हल्ल्यात वीजपुरवठा व पाणीपुरवठा यंत्रणांसह दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या सुविधांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये रशियाने पुन्हा एकदा राजधानी किव्हला लक्ष्य करून आपली मारक क्षमता दाखवून दिली.
रशियाने आतापर्यंत युक्रेनवर हल्ला करण्यासाठी जवळपास ४००हून अधिक ड्रोन्सचा वापर केल्याचे सांगण्यात येते. सोमवारी पहाटे करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये ३५ ड्रोन्सचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात वीजपुरवठा, पाणीपुरवठा तसेच ‘हिटिंग सिस्टिम्स’सह दूरसंचार यंत्रणेशी निगडित जागांनाही लक्ष्य करण्यात आले. पहाटेच्या या हल्ल्यानंतर राजधानी किव्हसह अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अंधार पसरल्याचे सांगण्यात येते. राजधानी किव्हसह जवळपास नऊ प्रांतांमधील वीज तसेच पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. काही शहरांमध्ये पुन्हा ‘ब्लॅकआऊट’ लागू करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.
युक्रेनच्या लष्कराने रशियाचे जवळपास ३० ड्रोन्स पाडल्याचा दावा केला असला तरी त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचीही कबुली दिली. सोमवारच्या ड्रोन हल्ल्यामुळे राजधानी किव्हसह इतर भागांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मोहिमेला चांगलीच खीळ बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. युक्रेनमधील आघाडीची वीजकंपनी ‘युक्रेनगो’ने पुढील काही महिने राजधानीसह इतर शहरांमधील वीजपुरवठा पूर्ववत होणे शक्य नसल्याचे बजावले आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन बेलारुसमध्ये दाखल झाले आहेत. साडेतीन वर्षानंतर प्रथमच पुतिन बेलारुसच्या अधिकृत दौऱ्यावर आले असून सोमवारी त्यांनी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संरक्षण तसेच सुरक्षाविषयक मुद्यांवर चर्चा झाली. सध्या रशियाचे सुमारे दहा हजार सैनिक बेलारुसमध्ये तैनात आहेत. त्याव्यतिरिक्त लढाऊ विमाने तसेच हवाई सुरक्षायंत्रणाही तैनात केली असून अण्वस्त्रांबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. रशिया बेलारुसच्या आघाडीवरून युक्रेनवर नवा हल्ला चढवेल, असे दावेही युक्रेन तसेच पाश्चिमात्य माध्यमांकडून करण्यात आले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |