चीनमध्ये एका दिवसात साडेतीन कोटींहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले

- अमेरिकी वेबसाईट ‘ब्लूमबर्ग’चा खळबळजनक दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये एका दिवसात कोरोनाचे तब्बल ३ कोटी, ७० लाख रुग्ण आढळल्याचे वृत्त अमेरिकेतील आघाडीची वेबसाईट ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे. मंगळवार २० डिसेंबर रोजी चीनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या नोंदविण्यात आली, असा खळबळजनक दावा अमेरिकी वेबसाईटने केला. चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’च्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर ही आकडेवारी प्रसिद्ध करीत असल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे. त्याचवेळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसांमध्येच चीनच्या लोकसंख्येपैकी १८ टक्के जनतेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाजही नॅशनल हेल्थ कमिशन’च्या बैठकीत व्यक्त करण्यात आला, असे वेबसाईटच्या वृत्तात सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसात चीनमधील कोरोनाच्या उद्रेकाने हाहाकार माजविला असून त्यासंदर्भातील खळबळजनक दावे व अंदाज चीनसह आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स ॲण्ड इव्हॅल्युएशन’ने(आयएचएमई) प्रकाशित केलेल्या अहवालात, ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतर देशभरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट होईल व २०२३ मध्ये जवळपास १० लाख जणांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला होता. त्यापूर्वी, कोरोना निर्बंध शिथिल केल्यास चीनमधील १३ ते २१ लाख नागरिक दगावतील, असे ब्रिटीश अभ्यासगटाने बजावले होते. तर चीनच्या संशोधकांनी, ‘झीरो कोविड पॉलिसी’ पूर्णपणे शिथिल केल्यास १५ लाख जणांचे बळी जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला होता.

जागतिक आरोग्य संघटनेसह, अमेरिका, युरोप व इतर आघाडीच्या देशांनीही चीनमधील वाढत्या कोरोना संसर्गावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. कोरोनाच्या उद्रेकामुळे चीनची अर्थव्यवस्था पुन्हा ठप्प झाली तर त्याचे जागतिक स्तरावर मोठे परिणाम होतील, अशी भीती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ‘ब्लूमबर्ग’ने प्रसिद्ध केलेले वृत्त खळबळ उडविणारे ठरते. ‘ब्लूमबर्ग’ने आपल्या वृत्तात चीनच्याच ‘नॅशनल हेल्थ कमिशन’च्या बैठकीचा हवाला दिल्याने ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. बुधवारी चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ची बैठक झाल्याचे अमेरिकी वेबसाईटने म्हटले आहे. या बैठकीत २० डिसेंबर रोजी संपूर्ण चीनमध्ये जवळपास तीन कोटी, ७० लाख रुग्ण आढळल्याचे म्हटले आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळणे हा जागतिक स्तरावरील विक्रम असल्याचेही वृत्तात सांगण्यात आले. कोरोनाच्या कालावधीत कोणत्याच देशात २४ तासांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले नाहीत.

या बैठकीत डिसेंबर महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसांमध्ये चीनमधील सुमारे २४ कोटी, ८० लाख जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ने व्यक्त केला. ही संख्या चीनच्या एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के इतकी आहे. राजधानी बीजिंग व सिच्युआन प्रांतातील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेखही चिनी यंत्रणेच्या बैठकीत करण्यात आला.

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info