मॉस्को/किव्ह – रशियाने शनिवारी डोन्बास क्षेत्रासह खेर्सन शहरात जबरदस्त मारा केला. खेर्सनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १० जण ठार झाले असून ५५हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर डोन्बासमधील प्रखर हल्ल्यांमुळे युक्रेनचे लष्कर बाखमतवरील ताबा लवकरच सोडेल, असा दावा रशियन अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. रशियाकडून हे हल्ले सुरू असतानाच युक्रेनच्या यंत्रणांनी, इराणने रशियन लष्कराला दीड हजारांहून अधिक कामिकाझे ड्रोन्स पुरविल्याचा आरोप केला आहे.
रशिया व युक्रेन या दोन्ही देशांमध्ये कडक हिवाळा सुरू असतानाही संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनने रशियन भागातील काही तळ तसेच इंधनसाठ्यांवर हल्ले केल्याचे समोर आले होते. या हल्ल्यांना रशियाने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने राजधानी किव्हसह अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले चढविले होते. केला होता. इराणी ड्रोन्सचा वापर करून पायाभूत सुविधा व संवेदनशील भागांना लक्ष्य करण्यात आले होते.
शनिवारी खेर्सनवर हल्ला करून रशियन संरक्षणदलांनी या क्षेत्रातील आपली आघाडी अजूनही भक्कम असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या महिन्यात युक्रेनी फौजांनी खेर्सनवर ताबा मिळवित रशियन लष्कराला माघारी घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर लवरकच युक्रेनी लष्कर क्रिमिआदेखील ताब्यात घेईल, अशा वल्गना युक्रेनी राष्ट्राध्यक्ष तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या, मात्र खेर्सन शहराच्या पुढे मोठे अथवा महत्त्वाचे शहर ताब्यात घेणे तसेच डिनिप्रो नदीचे पात्र ओलांडणे युक्रेनी फौजांना अद्यापही शक्य झालेले नाही. उलट रशियन फौजा खेर्सन शहराच्या नदीपलिकडील भागातून युक्रेनी भागांवर सातत्याने हल्ले करीत आहेत. या हल्ल्यांमुळे खेर्सनमधील वीज तसेच पाणीपुरवठा बंद पडला असून हजारो नागरिकांचे स्थलांतर करणे भाग पडले आहे.
खेर्सनबरोबरच डोन्बासमध्येही रशियाकडून मोठे हल्ले सुरू आहेत. शनिवारी बाखमत, ॲव्हडिव्हका तसेच सोलेदारच्या भागात रशियाकडून तोफा, रॉकेट्स व मॉर्टर्सचा मोठ्या प्रमाणात मारा करण्यात आला. रशियन लष्कराने युक्रेनच्या बाखमत शहरापर्यंत धडक मारली आहे. तसेच पुढच्या आठवड्यापर्यंत रशिया बाखमतवर ताबा मिळविणार असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को रशिया दौऱ्यावर दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वरिष्ठ मंत्र्यांसह बेलारुसचा दौरा केला होता. या भेटीदरम्यान संरक्षण तसेच सुरक्षाविषयक मुद्यांवर चर्चा झाली. सध्या रशियाचे सुमारे दहा हजार सैनिक बेलारुसमध्ये तैनात आहेत. त्याव्यतिरिक्त लढाऊ विमाने तसेच हवाई सुरक्षायंत्रणाही तैनात केली असून अण्वस्त्रांबाबत बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. रशिया बेलारुसच्या आघाडीवरून युक्रेनवर नवा हल्ला चढवेल, असे दावेही युक्रेन तसेच पाश्चिमात्य माध्यमांकडून करण्यात आले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |