रशियन लष्कराकडून पूर्व युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र व रॉकेट हल्ले

- परिस्थिती गंभीर असल्याचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

मॉस्को/किव्ह – रशियन लष्कराने पूर्व युक्रेनमधील मोहिमेची तीव्रता अधिकच वाढविल्याचे समोर येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियन लष्कराने बाखमत व ॲव्हडिव्हकासह जवळपास २५हून अधिक भागांमध्ये क्षेपणास्त्रे तसेच रॉकेट्सचा जबरदस्त मारा केला. रशियाने केलेल्या माऱ्यात डोन्बास क्षेत्रातील पायाभूत व संवेदनशील सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनच्या राजवटीने रशियाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमचे लष्कर युद्धाचे भवितव्य निश्चित करील, असा खरमरीत इशारा रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला.

क्षेपणास्त्र

गेल्या काही दिवसांमध्ये पुतिन यांनी एकापाठोपाठ बैठका घेऊन युक्रेनमधील मोहीम अधिक आक्रमक करण्याची तयारी सुरू केली आहे. रशियाच्या संरक्षणदलांबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी युक्रेनमधील संघर्षासाठी रशियन सरकार संरक्षणदलांना निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर रशियन संरक्षण कंपन्यांना दिलेल्या बैठकीत लष्कराला दर्जेदार व पुरेसा शस्त्रसाठा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या बैठका, त्यांची वक्तव्ये व रशियन सैन्याच्या हालचाली या आधारावर रशिया नव्या आक्रमणाची तयारी करीत असल्याचे दावेही पाश्चिमात्य माध्यमांनी प्रसिद्ध केले.

क्षेपणास्त्र

रशियन लष्कराने सध्या पूर्व युक्रेनवर आपले लक्ष अधिक केंद्रित केल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रशियन दलांनी डोन्बासमधील बाखमत, ॲव्हिडिव्हका, सिव्हेर्स्कि, डायलिव्हका, ड्रुज्बा, बेरेस्ोव्ह, मरिन्का या शहरांवर जबरदस्त हल्ले चढविले आहेत. रशियाच्या हल्ल्यांमध्ये बाखमत शहर जवळपास ६० टक्के उद्ध्वस्त झाल्याचा दावा युक्रेनच्या यंत्रणांनी केला. रशियन फौजा बाखमतला चारही बाजूंनी वेढा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसात रशियन लष्कराने डोनेत्स्क प्रांतात केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे १००हून अधिक जवान ठार झाल्याची माहिती रशियाने दिली.

क्षेपणास्त्र

वर्षअखेरपर्यंत डोनेत्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविण्याचे लक्ष्य रशियन लष्कराने ठेवल्याचा दावा युक्रेनच्या उपसंरक्षणमंत्री हॅना माल्यार यांनी केला. त्यासाठीच बाखमतसह अनेक भागांवर एकाच वेळी हल्ले चढविण्यात येत असल्याचेही युक्रेनी मंत्र्यांनी सांगितले. बाखमत हा युक्रेनी लष्करासाठी किल्ल्याप्रमाणे असून रशियाला त्यावर ताबा मिळविता आलेला नाही, असेही माल्यार म्हणाल्या. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही रशियाकडून डोन्बासमध्ये सुरू असणाऱ्या हल्ल्यांची दखल घेतली. पूर्व युक्रेनमधील आघाडीवर युक्रेनची स्थिती अत्यंत अवघड व वेदनादायी असल्याचे झेलेन्स्की म्हणाले. रशिया आपल्याकडील सर्व स्रोतांचा वापर करून डोन्बासला लक्ष्य करीत असल्याचेही युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

डोन्बासमध्ये चाललेल्या या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आक्रमक इशारा दिला. ‘युक्रेनच्या राजवटीला रशियाच्या प्रस्तावांची पूर्ण कल्पना आहे. युक्रेनने लष्करीकरण व नाझीवादाचा प्रसार पूर्णपणे थांबवावा व रशियाच्या सुरक्षेला असलेले धोके काढून टाकावेत. यात रशियाने नव्याने ताब्यात घेतलेल्या डोनेत्स्क, लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतांचाही समावेश आहे. युक्रेनसमोर आता फक्त ही मागणी मान्य करण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे. नाहीतर रशियाचे लष्कर त्यांच्या पद्धतीने युद्धाचा निकाल लावतील’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले. युद्ध कधी थांबवायचे हा निर्णय अमेरिका व युक्रेनमधील राजवटीच्या हाती आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info