जैश आणि लश्करच्या दहशतवादी सहभागामुळे अफगाणिस्तानातील संघर्ष आंतरराष्ट्रीय बनला – अफगाणी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांचा इशारा

काबुल – ‘माझे सरकार तालिबानबरोबर थेट चर्चा करायला तयार आहे. कारण लष्करी संघर्षातून अफगाणिस्तानचा प्रश्‍न सुटू शकत नाही. पण पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांच्या वाढत्या घुसखोरीमुळे अफगाणिस्तानातील संघर्ष आंतरराष्ट्रीय युद्ध बनले आहे’, असा जोरदार हल्ला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी चढविला. तसेच तालिबान व तालिबानच्या समर्थकांना खरोखरच राजकीय वाटाघाटी हव्या आहेत का, ते आंतरराष्ट्रीय समुदायाने तपासून घ्यावे, असे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी बजावले आहे.

गनी सरकार आणि तालिबानने राजकीय वाटाघाटीतून अफगाणिस्तानातील संघर्षावर तोडगा काढावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदाय करीत आहे. लष्करी सामर्थ्याचा वापर करून तालिबान अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करू शकत नाही व अशा राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने बजावले आहे. पण अश्रफ गनी यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन हटविल्याशिवाय चर्चा शक्य नसल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. ही मागणी अफगाणी सरकारकडून मान्य होण्याची अजिबात शक्यता नाही, याची तालिबानला पूर्ण कल्पना आहे. मात्र वेळ काढण्यासाठी तालिबानने ही मागणी पुढे केल्याचे विश्‍लेषक सांगत आहेत.

अशा परिस्थितीत, राष्ट्राध्यक्ष गनी यांनी बुधवारी अफगाणिस्तानातील सर्वपक्षीय बैठकीत बोलताना तालिबान व पाकिस्तानला लक्ष्य केले. अफगाणिस्तानात धार्मिकयुद्ध किंवा गृहयुद्ध सुरू नाही. तर अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या नेटवर्कचे युद्ध खेळले जात आहे, असा ठपका राष्ट्राध्यक्ष गनी यांनी ठेवला. तसेच भारतात घातपात माजविणार्‍या ‘जैश’ व ‘लश्कर’सारख्या दहशतवादी संघटना तालिबानच्या बरोबरीने अफगाणी लष्कराशी लढत आहेत, याकडे राष्ट्राध्यक्ष गनी यांनी लक्ष वेधले. तसेच ‘दाईश’ अर्थात ‘आयएस’ ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना देखील तालिबानला सहाय्य पुरवित आहे, असे सांगून या दहशतवादी संघटना तालिबानला सहाय्य करण्यासाठी पुढे आल्याने, अफगाणिस्तानची समस्या ही केवळ अफगाणिस्तानपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर ती आंतरराष्ट्रीय समस्या बनली आहे, असा गंभीर इशारा राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दिला.

तालिबान व संलग्न दहशतवादी संघटना कारबॉम्बस्फोट, आत्मघाती हल्ले, हत्याकांड, महिलांवर कठोर निर्बंध लादून मानवाधिकारांचे उल्लंघन करीत आहेत, याचीही आठवण राष्ट्राध्यक्ष गनी यांनी करून दिली. ‘तालिबानची प्रतिमा उजळविण्यासाठी पाकिस्तान करीत असेलल्या प्रयत्नांना बळी पडू नका. तालिबान ही दहशतवादी संघटना होती व यापुढेही राहिल आणि अशा संघटनेवर विश्‍वास ठेवण्यात अर्थ नाही’, असा संदेश याद्वारे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info