रशियाच्या संरक्षणदलांकडून युक्रेनवर 120 क्षेपणास्त्रांचा वर्षाव

- युद्ध सुरू झाल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचा युक्रेनचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला शांतीप्रस्ताव धूळफेक असल्याची टीका करीत रशियाने युक्रेनवर घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले चढविले. बुधवार व गुरुवारमध्ये 24 तासांच्या अवधीत रशियाच्या संरक्षणदलांनी युक्रेनवर तब्बल 120 क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा वर्षाव केला. यात राजधानी किव्हसह युक्रेनमधील प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने केलेला हा सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्षात सध्या दोन्ही बाजूंची कोंडी झाल्याचा दावा युक्रेनचे गुप्तचर प्रमुख किरिलो बुदानोव्ह यांनी केला.

120 क्षेपणास्त्रांचा वर्षाव

बुधवारी रात्रीपासूनच रशियन संरक्षणदलांनी युक्रेनी शहरांवर हल्ले सुरू केले. सुरुवातीला इराणच्या शाहेद ड्रोन्सचा वापर करण्यात आला. त्यानंतर युक्रेनमधील शहरांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्यात आले. राजधानी किव्हसह खार्किव्ह, खेर्सन, किव्हयि रिह, इव्हानो-फ्रँकिव्हस्क, लिव्ह, डिनिप्रोपेट्रोव्हस्क, ओडेसा, सुमी, मायकोलेव्ह या शहरांवर सर्वाधिक मारा करण्यात आला. युक्रेनमधील सर्व प्रांतांमध्ये एअर रेड सायरन्स वाजल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. ब्लॅक सीमधील रशियन युद्धनौका व लढाऊ विमानांच्या सहाय्याने क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

120 क्षेपणास्त्रांचा वर्षाव

फेब्रुवारी महिन्यात युद्धाला सुुरुवात झाल्यानंतर करण्यात आलेला हा सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील बहुतांश आघाडीच्या शहरांमध्ये ब्लॅकआऊट झाल्याचेही सांगण्यात येते. राजधानी किव्हमधील 40 टक्के वीजपुरवठा बंद झाला असून पश्चिम युक्रेनमधील लिव्ह शहरातील 90 टक्के घरांमध्ये ब्लॅकआऊट असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रशियाने युक्रेनमधील शहरांवर व्यापक क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांना सुरुवात केली होती. एकट्या डिसेंबर महिन्यात रशियाने युक्रेनवर सात मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केले आहेत.

रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेन व पाश्चिमात्य आघाडीकडून करण्यात येणारे दावे खोटे असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. युक्रेन व त्याला समर्थन देणाऱ्या अमेरिका तसेच युरोपिय देशांनी रशियाची लष्करी ताकद क्षीण होत चालल्याच्या वल्गना करण्यास सुरुवात केली होती. ऑक्टोबरमधील क्षेपणास्त्रांचे हल्लेही रशियाचे अखेरचे प्रयत्न असून रशियाकडील शस्त्रसाठा संपत आल्याचे पाश्चिमात्य माध्यमे व विश्लेषकांनी म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात दरवेळी होणाऱ्या मोठ्या हल्ल्यांमध्ये रशियाकडून किमान 40 ते 100हून अधिक क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रशियाकडील क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा साठा संपत आल्याचे दावे फोल ठरले आहेत.

रशियाकडून या महिन्यात युक्रेनविरोधातील हल्ल्यांची धार अधिक प्रखर करण्यात आल्याचे दिसत आहे. डोन्बास क्षेत्र तसेच खेर्सन शहरावर सातत्याने मारा सुरू असून युक्रेनी लष्कराची आगेकूच रोखण्यात रशियाने यश मिळविले आहे. रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनची राजवटही कोंडी झाल्याची कबुली देत आहे. युक्रेनच्या गुप्तचर प्रमुखांनी यासंदर्भात केलेले वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरते. त्यांनी रशियाबरोबरच युक्रेनच्या फौजाही पुढे जाण्यात अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे. दोन्ही देशांचे लष्कर सध्या आहे त्याच ठिकाणी थांबल्याचे गुप्तचर प्रमुख किरिलो बुदानोव्ह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मांडलेला दहा कलमी शांतीप्रस्ताव रशियाने फेटाळला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, युक्रेनने रशियन ताब्यातील भागांवर सांगितलेला अधिकार हा भ्रम असून शांतीप्रस्ताव नाकारत असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी रशियन संरक्षणदले युक्रेनला होणारा परदेशी शस्त्रसाठ्याचा पुरवठा तोडण्यासाठी नव्या योजना आखत असून पुढील काळात हल्ले वाढलेले दिसतील, असे बजावले.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info