मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शुक्रवारी 36 तासांच्या संघर्षबंदीची घोषणा केली होती. या काळात रशियाने युक्रेनवर मोठे हल्ले करण्याचे टाळले होते. मात्र युक्रेनी लष्कराने संघर्षबंदीचे पालन न करता रशियावर मोठे हल्ले चढविले होते. या हल्ल्यांना रशियाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, संघर्षबंदीची मुदत संपल्यानंतर मोठे व प्रखर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. क्रॅमाटोर्स्क व खार्किव्ह भागात रशियाने क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. दरम्यान, अमेरिकेने युक्रेनसाठी साडेतीन अब्ज डॉलर्सच्या नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली असून त्यात नव्या विमानभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
रशिया व पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणाऱ्या ‘ऑर्थोडॉक्स ख्रिस्तीधर्मियां’कडून 7 जानेवारीला ‘ख्रिसमस’चा सण साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, शुक्रवारी 6 जानेवारी रोजी 36 तासांच्या संघर्षबंदीची घोषणा केली होती. रशियन प्रमाणवेळेनुसार शुक्रवार 6 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत संघर्षबंदी लागू होईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले होते. मात्र युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी त्यावर टीका करून संघर्षबंदी पाळणार नसल्याचे संकेत दिले होते.
त्यामुळे संघर्षबंदीच्या काळातही युक्रेनी लष्कराने पूर्व युक्रेनसह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले केले होते. रशिया नियंत्रित डोनेत्स्कमध्ये वीजकेंद्रांना लक्ष्य करण्यात आले. क्रिमिआमध्ये ड्रोन हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र रशियन यंत्रणांनी तो उधळून लावला. लुहान्स्क, खेर्सन व झॅपोरिझिआमध्ये हल्ले झाल्याचेही रशियाकडून सांगण्यात आहे. संघर्षबंदीच्या काळात रशियाने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले असले तरी मोठे हल्ले करणे टाळले होते.
शनिवारी रात्री संघर्षबंदी संपल्यानंतर रशियाने मोठ्या प्रमाणात हल्ल्यांचे सत्र सुरू केले. क्रॅमाटोर्स्क भागात सात क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. खार्किव्हमध्येही क्षेपणास्त्र व रॉकेट हल्ले करण्यात आले. बाखमतमध्ये तोफा व रॉकेट्सच्या सहाय्याने प्रखर हल्ले करण्यात आले असून शहराचा बहुतांश भाग रशियाच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात येतो. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकेकडून रशिया-युक्रेन युद्धावर प्रतिक्रिया उमटली आहे.
‘पुढील किमान दोन महिने तरी रशिया युक्रेनमधील मोहीम चालू ठेवेल. या काळात रशिया आपल्या ताब्यात असलेला भाग सोडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे माघार घेण्याची शक्यता नाही. रशियाची सामरिक पातळीवरील योजना माहित नाही, पण युक्रेनमधील अनेक भागांमध्ये त्यांच्याकडून आक्रमक हल्ले सुरू आहेत व ते कायम राहतील’, असे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे समन्वयक जॉन किरबाय यांनी बजावले.
दरम्यान, अमेरिकेने युक्रेनला साडेतीन अब्ज डॉलर्सच्या नव्या शस्त्रपुरवठ्याची घोषणा केली आहे. यात ‘रिम7 सी-स्पॅरो’ या विमानभेदी क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. ही क्षेपणास्त्रे युक्रेनकडे सध्या असलेल्या ‘बक मिसाईल लाँचर्स’च्या सहाय्याने वापरण्याची योजना आखण्यात आली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |