पूर्व युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यात सहाशे युक्रेनी जवानांचा बळी गेल्याचा रशियाचा दावा

- रशियन प्रचारयुद्धाचा भाग असल्याचा युक्रेनचा आरोप

मॉस्को/किव्ह – पूर्व युक्रेनमधील क्रॅमाटोर्स्क शहरातील युक्रेनी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये सुमारे सहाशे युक्रेनी जवानांचा बळी गेल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. रशियन संरक्षण विभागाच्या या दाव्याला राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र युक्रेनने हे वृत्त फेटाळले असून हल्ल्यात एकही जवान मारला गेला नसल्याचा खुलासा केला. रशियाने केलेला दावा प्रचारयुद्धाचा भाग असल्याचे युक्रेन सरकारकडून सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारी रशियन फौजांनी बाखमत, सोलेदार तसेच खार्किव्ह भागात जबरदस्त हल्ले चढविले असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे.

सहाशे युक्रेनी जवानांचा बळी

वर्षाच्या सुरुवातीलाच युक्रेनने रशियन नियंत्रणाखाली असलेल्या डोनेत्स्क प्रांतातील माकिव्हका भागात रॉकेट्सच्या सहाय्याने मोठा हल्ला चढविला होता. या माऱ्यात रशियन लष्कराच्या एका इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात तब्बल 400 जवान मारले गेल्याचा दावा युक्रेनने केला होता. मात्र रशियन संरक्षण मंत्रालयाने सदर दावा फेटाळला होता. माकिव्हकावर सहा ‘हायमार्स’ रॉकेटस्‌‍चा मारा करण्यात आला व त्यात सुमारे 90 रशियन जवानांचा मृत्यू झाला, अशी माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने क्रॅमाटोर्स्कमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

सहाशे युक्रेनी जवानांचा बळी

क्रॅमाटोर्स्कमधील दोन इमारतींमध्ये युक्रेनी लष्कराने तात्पुरते तळ उभारले होते. या तळांवर एक हजारांहून अधिक युक्रेनी जवान तैनात होते. त्यापैकी सहाशेहून अधिक जवानांचा बळी गेल्याची माहिती आहे, असे रशियाच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे. मात्र या हल्ल्यासंदर्भात कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी सदर हल्ल्याची पुष्टी केली आहे. संरक्षणन विभागाने दिलेल्या माहितीवर रशियन सरकारला पूर्ण विश्वास आहे, असे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले.

सहाशे युक्रेनी जवानांचा बळी

मात्र युक्रेन सरकारने रशियाचे दावे फेटाळले आहेत. क्रॅमाटोर्स्कवरील हल्ल्यात एकाही युक्रेनी जवानाचा बळी गेलेला नसून सदर भागात युक्रेनचा तळ नसल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. रशियाने केलेले दावे प्रचारयुद्धाचा भाग असल्याचा आरोप युक्रेनच्या राजवटीने केला. युक्रेनकडून यासंदर्भातील काही फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत.

दरम्यान, सोमवारी रशियन लष्कराने खार्किव्हसह बाखमत व सोलेदार या शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र तसेच रॉकेटस्‌‍चे हल्ले केल्याचे समोर आले. खार्किव्ह भागात केलेल्या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती युक्रेनने दिली. तर सोलेदार व बाखमतमधील परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. सोलेदार व बाखमत ही पूर्व युक्रेनमधील सर्वाधिक रक्तरंजित आघाडी असल्याचे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले. मात्र बाखमत अजूनही रशियाच्या ताब्यात गेले नसून युक्रेनी लष्कर कडवा संघर्ष करीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info