बर्लिन/किव्ह – रशियाविरोधातील संघर्षात युक्रेनचा पराभव झाल्यास ही गोष्ट तिसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरु शकते, असा इशारा पोलंडच्या पंतप्रधानांनी दिला. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. त्याचवेळी युक्रेनला शस्त्रपुरवठा रोखण्यासाठी युरोपिय देशांकडे कोणतीही कारणे नसल्याची टीकाही पंतप्रधान मॅत्यूस्झ मोराविकी यांनी केली. तर क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविक यांनी, नाटो रशियाविरोधात ‘प्रॉक्सी वॉर’ खेळत असल्याचा दावा केला आहे.
रशिया-युक्रेन संघर्षात अमेरिकेसह युरोपिय देशांकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी मिळून युक्रेनला जवळपास 30 अब्ज डॉलर्सचे शस्त्रसहाय्य केल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यानंतरही युक्रेनकडून अधिकाधिक शस्त्रांची मागणी करण्यात येत आहे. युक्रेनच्या या मागणीला पोलंडसह बाल्कन देशांनी जोरदार समर्थन दिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या देशांकडून युक्रेनला शस्त्रपुरवठा करावा यासाठी सातत्याने आक्रमक वक्तव्ये करण्यात येत आहेत.
पोलंडचे पंतप्रधान मोराविकी यांनी दिलेला इशाराही त्याचाच भाग ठरतो. युक्रेनी लष्कर फक्त त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी नाही तर युरोपच्या सुरक्षेसाठीही लढते आहे, याची जाणीव युरोपिय देशांनी ठेवावी असे पोलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले. जर्मनीसारख्या आघाडीच्या देशाने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यात टाळाटाळ करु नये, अशी आग्रही भूमिका मोराविकी यांनी मांडली.
जर्मनीने युक्रेनला सुमारे एक अब्ज डॉलर्सहून अधिक संरक्षणसहाय्य पुरविले आहे. मात्र काही प्रगत शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावरून जर्मनी व युक्रेनमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. जर्मन बनावटीच्या यंत्रणा युक्रेनला पुरविण्यासाठी इतर युरोपिय देशांनी तयारी दर्शविली आहे. मात्र जर्मनीने त्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे युक्रेनने नाराजी व्यक्त केली असून युरोपिय देशांनीही जर्मनीवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या मुद्यावर जर्मनीने आपली भूमिका कायम ठेवली असून त्यात बदल करण्याचे नाकारले आहे. या पार्श्वभूमीवर थेट तिसऱ्या महायुद्धाचा उल्लेख करून पोलंडने जर्मनीवरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |