युक्रेनमधील संघर्षासाठी चीन रशियाला घातक शस्त्रास्त्रे पुरविण्याच्या तयारीत

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांचा आरोप

म्युनिक/बीजिंग/मॉस्को – ‘युक्रेन युद्धासाठी चिनी कंपन्या आतापर्यंत रशियाला घातक अथवा संहारक ठरणार नाहीत अशा प्रकारच्या यंत्रणा पुरवित आहेत. मात्र येणाऱ्या काळात चीन रशियाला घातक शस्त्रांचा पुरवठा सुरू करु शकतो’, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी केला. ब्लिंकन यांच्या आरोपांवर चीनने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शनिवारी म्युनिकमधील सुरक्षा परिषदेत चीनचे वरिष्ठ नेते वँग यी यांनी, आपण लवकरच युक्रेनमधील भूमिका स्पष्ट करणारे निवेदन जारी करु अशी घोषणा केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून २४ फेब्रुवारीला रशिया-युक्रेन शांतीकरारासाठी प्रस्ताव जाहीर होईल, असेही सांगण्यात येते.

चीन रशियाला घातक

म्युनिकमधील सुरक्षा परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध व चीनच्या ‘स्पाय बलून’चा मुद्दा अजेंड्यावर असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन व चीनचे नेते वँग यी यांच्यात या मुद्यावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. अमेरिकेने ‘बलून’चे प्रकरण अधिक ताणून धरु नये, अशी मागणी चीनच्या नेत्यांनी केली. तर चीनने बलून प्रकरणात संपूर्ण खुलासा करावा, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले. या चर्चेपूर्वी म्युनिकमध्ये झालेल्या भाषणात चीनचे नेते वँग यी यांनी, युरोपिय देशांसह पाश्चिमात्य आघाडीवर टीकास्त्र सोडले.

चीन रशियाला घातक

‘युक्रेन युद्धात चीनने आगीचा भडका उडविलेला नाही किंवा पूर्णपणे तटस्थतेची भूमिकाही घेतलेली नाही. आमची युद्धासंदर्भातील भूमिका मांडणारे निवेदन लवकरच प्रसिद्ध करू. यात सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडत्वाचा आदर करण्याच्या तत्वाला प्राधान्य देण्यात येईल. इतर देशांनीही रशिया-युक्रेन संघर्षाबाबत शांतपणे विचार करायला हवा. विशेषतः युरोपमधील देशांनी असे करण्याची गरज आहे. युद्ध थांबविण्यासाठी आपण काय करु शकतो याकडे लक्ष द्यायला हवे. काही घटकांना रशिया-युक्रेनमधील वाटाघाटी यशस्वी होऊ नये किंवा युद्ध लवकर संपू नये, असे वाटते’, असे वँग यी यांनी सांगितले.

चीन रशियाला घातक

यी यांच्या भाषणानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चीनच्या शस्त्रपुरवठ्याबाबत इशारा देणारे वक्तव्य केले. चीनने रशियाला घातक शस्त्रे पुरविली तर ही बाब अमेरिका व चीनमधील संबंधांसाठी गंभीर समस्या ठरेल, असे ब्लिंकन यांनी बजावले. यापूर्वी पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमधून पळवाटा काढण्यास तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी चीनने सहकार्य केले होते, याची आठवणही ब्लिंकन यांनी करून दिली. यापूर्वी रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ला सॅटेलाईट फोटोग्राफ्स पुरविल्याच्या मुद्यावरून अमेरिकेने चिनी कंपन्यांवर निर्बंध टाकले होते.

दरम्यान, युक्रेन युद्धासंदर्भातील वक्तव्यावरून रशियाने फ्रान्सला इतिहासाची आठवण करून देत टोला लगावला आहे. ‘फ्रान्सची सुरुवात मॅक्रॉन यांच्यापासून झालेली नाही. नेपोलिअनचे अवशेष अजूनही फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहेत. फ्रान्स व रशिया या दोघांनीही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी’, असे रशियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी बजावले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका मुलाखतीत, युक्रेनमध्ये रशिया पराभूत होणे गरजेचे आहे मात्र तो चिरडला जावा अशी आपली इच्छा नसल्याचे वक्तव्य केले होते. आपल्याला रशियात नेतृत्वबदल नको आहे, असेही मॅक्रॉन म्हणाले होते.

रशियाकडून युक्रेन आघाडीवरील हल्ल्यांची व्याप्ती वाढत असून डोनेत्स्कबरोबरच लुहान्स्क व खार्किव्हमधील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तोफा, रणगाडे, रॉकेटस्‌‍ व क्षेपणास्त्रांचा मारा सुरू असल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. क्रेमिना, कुपिआन्स्क व स्वातोव्ह भागाला रशियन फौजांकडून लक्ष्य करण्यात आल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info