युक्रेनच्या दहा प्रांतांवर रशियाकडून क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा

- हल्ल्यासाठी हायपरसॉनिक किन्झल क्षेपणास्त्रे वापरली

मॉस्को/किव्ह – गुरूवारी रशियाने युक्रेनच्या दहा प्रांतांवर रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचा भडीमार केला. यामध्ये सहा जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मात्र या हल्ल्यात युक्रेनमधील पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणात बाधित झाल्या आहेत. विशेषतः वीजनिर्मिती प्रकल्प रशियन माऱ्याचे लक्ष्य होते. त्यामुळे युक्रेनमध्ये बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. रशियाच्या ताब्यात असलेला युक्रेनचा झॅपोरिझिया अणुप्रकल्प देखील बंद झाल्याने युक्रेनच्या जनतेचे हाल होत असल्याचे सांगितले जाते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हे हल्ले चढविणाऱ्या रशियाचा कडक शब्दात निषेध केला. तर रशियाच्या ब्राय्‌‍न्स्क प्रांतावर युक्रेनने चढविलेल्या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून गुरूवारी युक्रेनच्या दहा प्रांतांवर हल्ले चढविल्याचे रशियाने म्हटले आहे.

दहा प्रांतांवर

गुरुवारी चढविलेल्या हल्ल्यात सुमारे दोन हजार किलोमीटरपर्यंत अचूकतेने मारा करू शकणाऱ्या ‘हायपरसॉनिक किन्झ्‌‍ल’ क्षेपणास्त्रांचा समावेश होता, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. तसेच युक्रेनच्या लष्कराने या महिन्याच्या सुरूवातीला रशियाच्या सीमेवरील ब्राय्‌‍न्स्क प्रांतावर हल्ला चढविला होता. त्याचे उत्तर देण्यासाठी रशियाने गुरुवारी हा हल्ला चढविला, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तसेच या हल्ल्यात युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प नष्ट झाले असून यामुळे युक्रेनच्या बऱ्याचशा भागात वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या या हल्ल्यांवर संताप व्यक्त केला आहे.

दहा प्रांतांवर

सर्वसामान्य नागरिकांना दहशतीखाली ठेवण्याखेरीज रशियन लष्कर दुसरे काहीही करू शकत नाही. वीजपुरवठा बाधित करून रशिया युक्रेनी जनतेचे मनोधैर्य खचविण्याचा प्रयत्न करीत आहे. जनतेला या युद्धाची झळ बसावी यासाठी रशियाची धडपड चाललेली आहे, अशी टीका राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात देखील रशियाने युक्रेनच्या वीजनिर्मिती प्रकल्पांना लक्ष्य केले होते. त्यावेळीही युक्रेनमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र त्यानंतरच्या काळात रशियाने इतक्या मोठ्या तीव्रतेचे हल्ले चढविले नव्हते. दारूगोला व शस्त्रास्त्रांची कमतरता, यामुळे रशियाला असे हल्ले चढविता आले नसावे, असा दावा केला जातो. पण गुरुवारच्या हल्ल्यामुळे रशियाचा हा प्रश्न सुटल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुतेरस युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले व त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. यावेळी गुतेरस यांनी हे युद्ध रोखण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला. याआधीही युक्रेनला अशा स्वरुपाचे प्रस्ताव मिळाले होते. पण व्लादिमिर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष असताना युक्रेन त्यांच्याशी चर्चा करणे शक्यच नाही, असे सांगून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी हे प्रस्ताव धुडकावले होते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांकडून आलेल्या मध्यस्थीच्या प्रस्तावावरही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया देत असल्याचे दिसते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सिद्धांतांचे रक्षण करण्यासाठी युक्रेन रशियाशी लढत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info