aकिव्ह/मॉस्को – गुरुवारी रशियाने युक्रेनच्या दहा प्रांतांवर केलेल्या क्षेपणास्त्रे, रॉकेट्स व ड्रोन्सच्या जबरदस्त माऱ्यानंतर युक्रेनच्या लाखो घरांमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. या हल्ल्यांमध्ये रशियाने हायपरसॉनिक किन्झ्ल क्षेपणास्त्रांचाही समावेश केला होता. ही क्षेपणास्त्रे भेदण्याची क्षमता आपल्याकडे नसल्याची कबुली युक्रेनच्या लष्कराने दिली. तर रशिया नागरी सोयीसुविधांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. मात्र रशियाने केलेल्या शुक्रवारच्या भीषण हल्ल्यामुळे युक्रेन व युक्रेनला पाठिंबा देणारे पाश्चिमात्य सहकारी देश हादरल्याचे दिसत आहे.
युक्रेनच नाही, तर पाश्चिमात्य देशांनी देखील रशियाने गुरूवारी चढविलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेतली. याआधी युक्रेनवर मारा करण्यासाठी रशियाकडे पुरेशा प्रमाणात क्षेपणास्त्रे व रॉकेट्स नसल्याचा दावा पाश्चिमात्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर, इतर क्षेपणास्त्रांसह किन्झ्ल या सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरापर्यंत अचूकतेने मारा करण्याची क्षमता असलेल्या ‘किन्झ्ल’चा वापर करून रशियाने युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनांही धक्का दिला. या हल्ल्यात युक्रेनचा वीजपुरवठा बाधित झाला व लाखो घरांना याचा फटका बसला होता.
शुक्रवारी यापैकी बऱ्याच घरांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात युक्रेनला यश मिळाल्याचे दावे करण्यात येत आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशिया युक्रेनी जनतेला लक्ष्य करीत असल्याचे आरोप केले आहेत. युक्रेनच्या जनतेचे मनोधैर्य खचविण्यासाठीच रशियाने नागरी भागांना लक्ष्य केल्याचा दावाही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला. मात्र रशियाने हे आरोप फेटाळले. आपल्या ब्राय्न्स्क या सीमेजवळील भागावर युक्रेनी लष्कराने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गुरूवारचे हल्ले चढविण्यात आल्याचे रशियाने म्हटले होते. पुढच्या काळात रशियाने वारंवार असे हल्ले चढविले, तर युक्रेन फार काळ या युद्धात तग धरू शकत नाही, हे उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने रशिया युक्रेनवर वारंवार अशा तीव्रतेचे हल्ले चढवू शकत नाही, असा दावा केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये काही काळाचे अंतर ठेवणे रशियाला भाग पडेल, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. अशा दाव्यांद्वारे ब्रिटन रशियाचे घणाघाती हल्ले सहन करीत असलेल्या युक्रेनला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. पण युक्रेनवर हल्ल्यासाठी आपल्या देशाकडे पर्याप्त प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा व क्षेपणास्त्रे असल्याचे रशियाने याआधीच जाहीर केले आहे. असे असले तरी रशिया आपल्याकडील शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा वापर सुयोग्यरित्या करीत आहे. तर अमेरिका व नाटोकडून मिळालेली शस्त्रास्त्रे वापरण्याची समज व कौशल्य अजूनही युक्रेनी लष्कराकडे आलेले नाही. त्यामुळे या शस्त्रास्त्रांचा व संरक्षणसाहित्याचा वापर युक्रेनचे लष्कर बेजबाबदारपणे करीत असल्याची तक्रार काही युरोपिय देशांनी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देऊन माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |