रशियन जेटस्‌‍च्या धडकेने रिपर ड्रोन समुद्रात कोसळल्याचा अमेरिकेचा दावा

- अमेरिकेच्या हालचाली चिथावणीखोर असल्याचे रशियाचे प्रत्युत्तर

वॉशिंग्टन/मॉस्को – ब्लॅक सी सागरी क्षेत्रात मोहिमेवर असलेले ‘एमक्यू-९ रिपर ड्रोन’ रशियन लढाऊ विमानांच्या धडकेने समुद्रात कोसळले, असा आरोप अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून त्यानंतर अमेरिकेने रशियन राजदूतांना समन्स पाठवून घटनेचा खुलासा देण्याची मागणी केली. मात्र अमेरिकेच्या आरोपांना रशियाने प्रत्युत्तर दिले असून अमेरिकी ड्रोनच्या कारवाया चिथावणीखोर होत्या, असे बजावले आहे. या घडामोडीनंतर काही तासांमध्ये नाटो सदस्य देशांच्या लढाऊ विमानांनी रशियन विमानांना माघारी पिटाळल्याच्या दोन घटनाही समोर आल्या आहेत. यामुळे रशिया व पाश्चिमात्य देशांमधील तणाव अधिकच चिघळला असून युक्रेनमधील संघर्षाची व्याप्ती अधिकच वाढेल, असा दावा काही विश्लेषकांनी केला.

रिपर ड्रोन

मंगळवारी सकाळी अमेरिकेचे ‘एमक्यू-९ रिपर ड्रोन’ रोमानियापासून काही अंतरावर असलेल्या हद्दीत गस्त घालत होते. अमेरिकेच्या दाव्यांनुसार सदर भाग आंतरराष्ट्रीय हवाईहद्दीत मोडतो. मात्र रशियाने अमेरिकी ड्रोन निर्बंधित क्षेत्रात उडत असल्याचा दावा केला. काही रशियन माध्यमांनी अमेरिकी ड्रोन क्रिमिआतील बंदरापासून ६० किलोमीटर्स अंतरावर उडत होते, असे म्हटले आहे. पण कोणत्याही देशाने ड्रोन नक्की कोणत्या भागात होते, याची ठोस माहिती दिलेली नाही.

रिपर ड्रोन

ड्रोन गस्त घालत असताना रशियाच्या दोन ‘एसयु-२७’ लढाऊ विमानांनी अमेरिकी ड्रोनला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्रोनने आपली गस्त सुरूच ठेवली. रशियन विमानांनी त्यांच्याकडील इंधन ड्रोनवर टाकून नंतर प्रॉपेलरला धक्का दिल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. मात्र रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. रशियन विमानांनी दिलेल्या वॉर्निंगनंतर अमेरिकेच्या ड्रोनने दूर जाण्यासाठी उलटसुलट उड्डाणे केली व ती सुरू असतानाच ड्रोन समुद्रात कोसळले, असे रशियाकडून सांगण्यात आले.

रिपर ड्रोन

अमेरिकी ड्रोन कोसळलेली जागा खोल समुद्राचा भाग असून त्यातून ड्रोन बाहेर काढण्याची क्षमता अमेरिकेकडे नसल्याचे संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीत रशियन नौदलाच्या पथकांनी ड्रोनचे बरचसे अवशेष बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र याला कोणत्याही देशाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे अमेरिकी ड्रोनचे नक्की काय झाले, हे अजूनही गूढ आहे. ड्रोन माघारी मिळणार नसले तरी अमेरिकेने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार आगपाखड सुरू केली आहे. अमेरिकेतील रशियाचे राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांना तातडीने समन्स पाठविण्यात आले आहे. रशियन राजवटीने संपूर्ण घटनेचा खुलासा द्यावा, अशी मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय हद्दीत गस्त घालण्यासाठी अमेरिकेला रशियाच्या परवानगीची गरज नसल्याचा टोला व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी लगावला. अशा कारवायांमधून जर रशिया अमेरिकेला संदेश देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते त्यात अपयशी ठरले आहेत अशी टीकाही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केली.

रशियाचे राजदूत ॲन्टानोव्ह यांनी अमेरिकेला सणसणीत प्रत्युत्तर दिले. अमेरिकी ड्रोनच्या कारवाया चिथावणीखोर होत्या व रशियन विमानांनी कोणतीही चूक केलेली नाही, असे रशियन राजदूतांनी ठामपणे बजावले. ‘अमेरिकेने रशियाच्या हद्दीनजिक विरोधी कारवाया करणारी उड्डाणे थांबवावी अन्यथा परिणामांची तयारी ठेवावी’, असा इशारा ॲन्टानोव्ह यांनी दिला. तर अमेरिकी ड्रोनच्या घटनेनंतर रशिया व अमेरिकेतील संबंध रसातळाला पोहोचले आहेत, असे रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्hह यांनी बजावले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info