नॉर्दन अलायन्स तालिबानबरोबरच पाकिस्तानी लष्कराशी लढत आहे

नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमद मसूदचा आरोप

काबुल – ‘तालिबानने पंजशीरचा ताबा घेतला असून अफगाणिस्तानातले युद्ध आता संपले आहे’, असा दावा तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने केला. पण पंजशीरमधून नॉर्दन अलायन्स अजूनही संघर्ष करीत असल्याचे अहमद मसूद यांनी घोषित केले. तसेच नॉर्दन अलायन्स केवळ तालिबानशी नाही, तर पाकिस्तानी लष्कराशी झुंज देत आहे, असा आरोप मसूद यांनी केला. पाकिस्तानी हवाई दलांद्वारे पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सवर हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. पुढच्या काळात या हस्तक्षेपाची जबर किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागू शकते.

गेल्या तीन आठवड्यांपासून तालिबानचे दहशतवादी पंजशीरवर ताबा मिळविण्यासाठी धडका मारत होते. त्याला यश मिळाल्याची घोषणा तालिबानचा प्रवक्ता मुजाहिद याने सोमवारी केली. या विजयामुळे अफगाणिस्तान युद्धाच्या दलदलीतून बाहेर पडल्याचा दावा मुजाहिदने केला. यानंतर पंजशीरची राजधानी बझराकच्या गव्हर्नर हाऊसवर ताबा घेऊन ध्वज फकडविल्याचा व्हिडिओ तालिबानने प्रसिद्ध केला. तसेच नॉर्दन अलायन्सचा नेता व प्रवक्ता फहीम दश्ती तालिबानच्या हल्ल्यात ठार झाल्याचे जाहीर केले.

नॉर्दन अलायन्सचे नेते अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधून पलायन केल्याच्या बातम्या नव्याने प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे पंजशीरमधून तालिबानविरोधात सुरू असलेला अफगाणी जनतेचा संघर्ष संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र नॉर्दन अलायन्सच्या लष्करी आघाडीचे नेते अहमद मसूद यांनी तालिबानचा हा दावा खोडून काढला. ‘मी जिवंत असून पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सचा संघर्ष अजूनही सुरू आहे’, असे मसूद यांनी जाहीर केले.

‘पंजशीरवर हल्ला चढविण्याची क्षमता तालिबानमध्ये नाही. पाकिस्तान ड्रोन्स, हेलिकॉप्टर्सद्वारे तालिबानला सहाय्य करीत असून नॉर्दन अलायन्स पाकिस्तानलाही झुंज देत आहे’, असे मसूद पुढे म्हणाले. पंजशीरवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानने चिनी बनावटीच्या ‘सीएच-४’ ड्रोनमधून हल्ले चढविल्याचे बोलले जाते. तसेच नॉर्दन अलायन्सविरोधी संघर्षासाठी पाकिस्तानने लष्कराचे स्पेशल फोर्सेस उतरविल्याच्या बातम्याही आल्या आहेत. पण अद्याप या दाव्यांना पुष्टी मिळालेली नाही.

पण दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद यांनी काबुलला भेट दिली होती. हक्कानी गटाने तालिबानच्या सरकारचे नेतृत्व करावे, अशी अट हमीद यांनी तालिबानसमोर ठेवली होती. यावर संतापलेल्या तालिबानमधील बरादर गटाने पंजशीरमधून आपल्या समर्थकांना माघारी बोलावले होते. त्यामुळे हक्कानी गटाला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानला आपले जवान तालिबानचे जिहादी म्हणून तैनात करावे लागल्याचे आरोपही झाले होते. अशा परिस्थितीत, अहमद मसूद यांनी केलेल्या आरोपांचे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान, तालिबानच्या मदतीसाठी अफगाणिस्तानात लष्कर तैनात करणार्‍या पाकिस्तानला येत्या काळात जबर किंमत चुकती करावी लागू शकते. कारण तालिबानसह पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर जगभरातील प्रमुख देशांनी नजर रोखलेली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या या कारवायांकडे दुर्लक्ष करणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अवघड जाऊ शकते. सोशल मीडियावर पाकिस्तानवर निर्बंध टाका अशी मागणी सुरू झाली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानातील सर्वसामान्य जनता आपल्या दुर्दशेला पाकिस्तानलाच जबाबदार धरीत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info