रशियाने युक्रेन आघाडीवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली

- लढाऊ विमाने, ड्रोन्स व रॉकेटस्‌‍चा वापर

मॉस्को/किव्ह – रशियन संरक्षणदलांकडून युक्रेन आघाडीवरील हल्ल्यांची तीव्रता सातत्याने वाढविण्यात येत असल्याचे समोर येत आहे. यात उत्तर युक्रेनमधील खार्किव्हपासून ते दक्षिण युक्रेनमधील ओडेसा शहरापर्यंतच्या भागात केलेल्या हल्ल्यांचा समावेश आहे. हल्ल्यांसाठी रशियाने लढाऊ विमानांबरोबरच ड्रोन्स व मल्टिपल रॉकेट सिस्टिम्सचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. तर गेल्या 36 तासांमध्ये रशियाने दीडशेहून अधिक हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराकडून करण्यात आला.

हल्ल्यांची तीव्रता

रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर वर्षभरात रशियन संरक्षणदलांची मोठी हानी झाल्याचे व रशियाकडील शस्त्रसाठा प्रचंड प्रमाणात घटल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमे तसेच यंत्रणांनी केले होते. रशिया दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील तसेच शीतयुद्धाच्या काळातील शस्त्रसाठा बाहेर काढून त्याचा वापर करीत असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र गेल्या दोन महिन्यांमधील रशियाच्या हल्ल्यांकडे नजर टाकल्यास सदर दावे व वक्तव्ये फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हल्ल्यांची तीव्रता

डोन्बास प्रांतातील सोलेदार शहरावर मिळवलेला ताबा व बाखमतच्या जवळपास 90 टक्के भागावर नियंत्रण मिळविणाऱ्या रशियन संरक्षणदलांनी आपल्या हल्ल्यांची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. गेले काही आठवडे रशिया सातत्याने तोफा, रॉकेटस्‌‍ व मॉर्टर्सचा मोठ्या प्रमाणात मारा करीत आहे. तर नजिकच्या काही दिवसांपासून रशियाच्या संरक्षणदलांनी हवाईहल्ल्यांची संख्याही वाढविली आहे. यापूर्वी फक्त लांब पल्ल्यांवरील हल्ल्यांसाठी रशिया हवाई माऱ्याचा वापर करीत होता. मात्र आता डोन्बास क्षेत्रातील भागांवरही हवाईहल्ले सुरू झाले आहेत.

गेल्या 36 तासांमध्ये रशियाने जवळपास 30 हवाईहल्ले केले असून ओडेसा भागात आत्मघाती ड्रोन्सचाही मारा करण्यात आला. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्हमध्ये क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. बाखमत, ॲव्हडिव्हका, मेरिंका व शाख्तार भागात 50हून हल्ले चढविण्यात आले. यासाठी मल्टिपल रॉकेट सिस्टिम्सचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. झॅपोरिझिआमध्ये 70हून अधिक आर्टिलरी हल्ले झाल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

हल्ल्यांची तीव्रता

दरम्यान, रशियाच्या बेलगोरोद शहरात शनिवारी एक न फुटलेला बॉम्ब आढळण्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. जवळपास तीन हजार नागरिकांना हलविण्यात आल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी याच भागात रशियाच्या लढाऊ विमानाकडून चुकून हल्ला झाल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली होती.

शुक्रवारी जर्मनीत पार पडलेल्या बैठकीनंतर युक्रेनने पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांकडे शस्त्रपुरवठा वाढविण्याची मागणी केली आहे. युक्रेनचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे मेल्निक यांनी, पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या जीडीपीच्या एक टक्के इतका निधी युक्रेनच्या शस्त्रपुरवठ्यासाठी द्यावा, असे मेल्निक म्हणाले. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रसहाय्य दिले असले तरी रशियाविरोधात जिंकण्यासाठी अजून दहा पट शस्त्रांची गरज आहे, असा दावाही युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी केला.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info