गाझापट्टीतून इस्रायलवर 547 रॉकेट्सचे हल्ले

- इस्रायलच्या कारवाईत इस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर ठार - इस्लामिक जिहादकडून इस्रायलवर हल्ले सुरू ठेवण्याची घोषणा - अमेरिका, अरब देशांकडून इस्रायलला संघर्षबंदीचे आवाहन

जेरूसलेम/कैरो – गाझापट्टीतील दहशतवादी संघटना आणि इस्रायलमध्ये सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या दिवशी अधिकच तीव्र झाला. अवघ्या काही तासात गाझातून इस्रायलच्या दिशेने 547 रॉकेट्स डागण्यात आले. तर इस्रायलने गाझातील इस्लामिक जिहादच्या 166 ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये या दहशतवादी संघटनेचा आणखी एक वरिष्ठ कमांडर मारला गेला असून गाझात ठार झालेल्यांची संख्या 27वर पोहोचली आहे. इस्लामिक जिहाद तसेच हमासने इस्रायलवरील रॉकेट हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिला. तर अमेरिका व अरब देशांनी इस्रायलला संघर्षबंदीचे आवाहन केले आहे.

हल्ले

गेल्या आठवड्यात इस्रायलच्या कोठडीत इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्याचा उपोषणामुळे बळी गेल्यानंतर गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव झाला होता. इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा आयर्न डोमने यापैकी 90 टक्के रॉकेट्स नष्ट केली. यानंतर इस्रायलने इस्लामिक जिहादच्या या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. दोन दिवसांपूर्वी, मंगळवारी गाझातील इस्लामिक जिहादच्या ठिकाणांवर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ले चढविले. यामध्ये सदर दहशतवादी संघटनेचे तीन महत्त्वाचे कमांडर्स ठार झाले. तसेच 12 नागरिकांचाही यात बळी गेला होता. तर बुधवारच्या हवाई कारवाईत इस्लामिक जिहादचा आणखी एक दहशतवादी मारला गेला.

हल्ले

यानंतर इजिप्तने इस्रायल व इस्लामिक जिहादमध्ये संघर्षबंदी घडविल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण यामध्ये तथ्य नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव सुरू झाला. इस्रायलच्या संरक्षणदलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझातून 547 रॉकेट्सचा मारा झाला. यातील इस्रायलच्या हद्दीपर्यंत पोहोचणारे 200 रॉकेट्स आयर्न डोमने भेदले. तर 107 रॉकेट्स गाझापट्टीतच कोसळले. इस्रायलच्या संरक्षणदलाने आयर्न डोमच्या या कारवाईचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला. तसेच गाझातील इस्लामिक जिहादच्या 166 ठिकाणांवर हवाई हल्ले चढविल्याची माहितीही इस्रायली संरक्षणदलाने दिली.

हल्ले

अरब लीगने इस्रायलच्या या कारवाईवर टीका केली. अरब देशांनी इस्रायलकडे गाझापट्टीत संघर्षबंदीची मागणी केली. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनानेही संघर्षबंदीसाठी इस्रायलवर दडपण टाकण्यास सुरुवात केल्याची बातमी इस्रायली वर्तमानपत्राने दिली आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी या संघर्षबदीसाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो. इजिप्तचे प्रतिनिधी लवकरच यासाठी तेल अविवमध्ये दाखल होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण गाझातील हमास व इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनाच संघर्षबंदी नको असल्याचे दिसत आहे. या दोन्ही संघटनांनी इस्रायलवर यापुढेही हल्ले होत राहतील, असे जाहीर केले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी संरक्षणदलांनी गाझातील दहशतवाद्यांविरोधात छेडलेली ‘ऑपरेशन शिल्ड अँड ॲरो’ ही मोहीम संपलेली नसल्याचे जाहीर केले. इस्लामिक जिहादच्या विरोधातील हा संघर्ष इस्रायलच्या विजयानेच संपेल, असे नेत्यान्याहू यांनी ठणकावले. संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी लष्कराला मोठ्या कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तर परराष्ट्रमंत्री एली कोहेन यासंदर्भात अमेरिका, युरोप तसेच अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर चर्चा करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info