किव्ह/मॉस्को – गेले काही आठवडे रशियन हद्दीत ड्रोनहल्ले करणाऱ्या युक्रेनी लष्कराने आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढविल्याचे समोर आले. शनिवारी युक्रेनच्या लष्कराने ब्रिआन्स्क प्रांतात केलेल्या हल्ल्यात रशियाची दोन लढाऊ विमाने व दोन लष्करी हेलिकॉप्टर्स उडवून दिली. रशियन हवाईदलाच्या तुकडीचा भाग असलेली ही विमाने व हेलिकॉप्टर्स युक्रेनच्या चेर्निहिव भागावर हल्ले चढविण्याच्या मोहिमेवर जात होती, अशी माहिती रशियन दैनिकाने दिली आहे. युक्रेनने रशियन हद्दीत रशियन विमाने व हेलिकॉप्टर्स उडवून देण्याची ही पहिलीच घटना ठरते.
गेल्याच आठवड्यात युक्रेनच्या काही अधिकाऱ्यांसह रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’च्या प्रमुखांनी युक्रेनचे ‘स्प्रिंग काऊंटरऑफेन्सिव्ह’ सुरू झाल्याचे दावे केले होते. युक्रेनकडून रशियावर होणारे वाढते ड्रोनहल्ले तसेच गेल्या आठवड्यात बाखमतसह डोन्बासमधील रशियन आघाडीवर झालेले प्रखर हल्ले प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेचाच भाग असल्याचे सांगण्यात येते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून युक्रेनने रशियावर किमान तीन मोठे ड्रोनहल्ले केले असून त्यात क्रिमिआसह बेलगोरोद, ब्रिआन्स्क व कुर्स्क प्रांताला लक्ष्य करण्यात आले आहे.
या ड्रोनहल्ल्यांपाठोपाठ युक्रेनी लष्कराने बाखमत तसेच डोन्बासमधील काही महत्त्वाच्या भागांमध्ये मोठे हल्ले करून रशियाच्या बचावफळीला धक्का दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. रशियाच्या संरक्षण विभागाने त्या फेटाळत रशियन लष्कराने काही ठिकाणी फेररचनेसाठी तैनातीत बदल केल्याची माहिती दिली होती. तर परदेशी विश्लेषक व यंत्रणांनी युक्रेनने नवी शस्त्रे तसेच यंत्रणांचा वापर सुरू केल्याने रशियाला हादरे बसण्यास सुरुवात झाल्याचे दावे केले. शनिवारी रशियन हवाईदलाच्या तुकडीवर झालेला हल्ला या दाव्यांना दुजोरा देणारा ठरतो.
रशियातील ‘कॉमरसॅन्ट’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तात, हवाईदलाकडून युक्रेनवरील हल्ल्यासाठी ‘रेडिंग पार्टी’ पाठविण्यात आली होती असे म्हंटले आहे. या तुकडीत ‘एसयु-34 बॉम्बर’, ‘एसयु-35’ व दोन ‘एमआय-8’ हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. रशियाच्या लढाऊ विमानांकडून चेर्निहिव भागात क्षेपणास्त्र तसेच बॉम्बहल्ले करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वी रशिया-युक्रेन सीमेवरील ब्रिआन्स्क प्रांतात दोन्ही विमाने व हेलिकॉप्टर्स उडवून दिल्याचा दावा रशियन दैनिकाने केला.
रशियन विमाने व हेलिकॉप्टर्स कशा रितीने पडली याबाबत ठोस माहिती दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही. मात्र युक्रेनच्या सोशल मीडियावर अमेरिकेने दिलेल्या ‘पॅट्रिऑट’ किंवा ‘ॲम्रॅम’ क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्याचे दावे करण्यात आले आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखाईल पोडोलिक यांनी रशियन विमाने व हेलिकॉप्टर्स पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी ती युक्रेनने पाडली का याबाबत माहिती देण्याचे टाळले आहे. युक्रेन रशियाच्या हद्दीत हल्ले चढवीत असतानाच रशियाने युक्रेनच्या पश्चिम भागात ड्रोनहल्ले केल्याचे समोर आले आहे.
रशियाने पश्चिम युक्रेनमधील ख्मेलनिटस्की प्रांतात 20हून अधिक ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले केले. यात युक्रेनमधील शस्त्रांचे कोठार लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची माहितीही युक्रेनी यंत्रणांनी दिली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |