मॉस्को/किव्ह – बाखमतवरील ताब्यानंतर युक्रेनच्या विविध भागांमध्ये हल्ले चढविणाऱ्या रशियाला सोमवारी युक्रेनने हादरा दिला. युक्रेन-रशिया सीमेनजिक असलेल्या बेलगोरोद प्रांतात युक्रेन समर्थक गटांनी घुसखोरी करून जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात एक शहर ताब्यात घेतल्याचा दावाही युक्रेनी गटांकडून करण्यात आला होता. मात्र रशियन संरक्षणदलांनी आक्रमक कारवाई करून हल्ला परतवून लावला आहे. कारवाईदरम्यान ७० जणांना ठार केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली.
सोमवारी युक्रेन व पाश्चिमात्य यंत्रणांनी प्रशिक्षण दिलेल्या आणि रशियन नागरिकांचा समावेश असलेल्या दोन गटांनी रशियन सीमेत घुसखोरी करून बेलगोरोद प्रांतात जोरदार हल्ला चढविला. हे जवान ‘फ्रीडम ऑफ रशिया लिजन’ व ‘रशियन व्हॉलेंटिअर कॉर्प्स’ या दोन गटांचे सदस्य असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी लष्करी गणवेश घातला होता. आपण पुतिन यांच्या राजवटीला विरोध करणारे रशियन नागरिक असल्याचा दावा या जवानांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला.
या हल्ल्यापूर्वी युक्रेनच्या लष्कराने बेलगोरोद सीमेच्या भागात मोठ्या प्रमाणात तोफा व रणगाड्यांचा मारा केला होता. या माऱ्याच्या फायदा घेऊन सदर गटाचे सदस्य रशियन सीमेत घुसल्याचे मानले जाते. दोन्ही गटांकडे सशस्त्र वाहने, रॉकेटस् व इतर प्रगत शस्त्रास्त्रे असल्याचे आढळले आहे. युक्रेन समर्थक गटांचा हल्ला सुरू असतानाच बेलगोरोदमध्ये ड्रोन्सचे हल्लेही करण्यात आले. हल्ल्यादरम्यान रशियन प्रांतातील एक भाग ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला होता. रशियन सीमेत घुसून झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर रशियाने नजिकच्या परिसरातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले व व्यापक मोहीम हाती घेतली. हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने, ड्रोन्स यांच्या सहाय्याने हल्ला मोडून काढण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली. जवळपास १२ तासांहून अधिक काळ रशियन संरक्षणदलांची कारवाई सुरू होती, असे सांगण्यात येते. या कारवाईत युक्रेन समर्थक गटांमधील ७० जणांना ठार केले असून शस्त्रसाठाही नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली.
युक्रेनने बेलगोरोदमध्ये हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र हल्ला करणारे गट रशियन होते, असे सांगून जबाबदारी झटकली आहे. रशियन यंत्रणांनी सदर गट युक्रेन व पाश्चिमात्य देशांकडून प्रशिक्षण घेतलेले असल्याचा आरोप केला आहे. या गटांचा उल्लेख रशियाकडून दहशतवादी गट असा करण्यात आला आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर सातत्याने सीमेनजिक असणाऱ्या बेलगोरोद प्रांताला लक्ष्य करण्यात आले होते.
सोमवारी झालेल्या हल्ल्यापूर्वीही बेलगोरोदमध्ये किमान तीन हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र युक्रेन व पाश्चिमात्य माध्यमांनी या हल्ल्यांची रशियाचा ‘फॉल्स फ्लॅग अटॅक’ अशी संभावना केली होती. पण सोमवारचा हल्ला रशियाच्या सुरक्षायंत्रणांना धक्का देणारा ठरला असून पुढील काळात असे अनेक हल्ले होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |