Breaking News

खोट्या बातम्या देणारी माध्यमे म्हणजे अमेरिकेचे शत्रू

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घणाघाती टीका

वॉशिंग्टन – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांच्याबरोबरील आपल्या भेटीचे अमेरिकन माध्यमांनी केलेले वार्तांकन विपर्यास्त असल्याची घणाघाती टीका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ‘फेक न्यूज’ अर्थात खोटारड्या बातम्या देणारे अमेरिकन जनतेचा सर्वात मोठा शत्रू ठरतात, असे ठपका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठेवला. सोशल मीडियाद्वारे ट्रम्प यांनी अमेरिकी माध्यमांना हा टोला लगावला आहे. २०१७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेची माध्यमे देशाची शत्रू असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

खोट्या बातम्या

उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांच्याबरोबरील सिंगापूरमध्ये झालेल्या ट्रम्प यांच्या चर्चेकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले होते. ही चर्चा यशस्वी ठरल्याचा दावा करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेला उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांकडून असलेला धोका टळल्याचा दावा केला होता. तसेच अमेरिकन जनतेने आता निश्‍चिंतपणे झोप घ्यावी, असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र अमेरिकन माध्यमांनी या चर्चेवर शंका उपस्थित करून याबाबत काही प्रश्‍न विचारले होते. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाबरोबरील अमेरिकेचा युद्धसराव रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच्या मोबदल्यात उत्तर कोरियाच्या हुकूमशहांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतल्याचे दावे अमेरिकन माध्यमांकडून केला जातो.

यावर खवळलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी माध्यमांना धारेवर धरले. उत्तर कोरियाच्या हुकूमशहांबरोबरील आपल्या चर्चेला मिळालेल्या यशाची बातमी दडपण्यासाठीच अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, असे दावे ट्रम्प यांनी केले. जवळपास ५०० दिवसांपूर्वी अमेरिकन माध्यमांनी अगदी विरोधी भूमिका घेऊन, उत्तर कोरियाबरोबरील अमेरिकेचे युद्ध टाळण्यासाठी आत्ता झालेल्या गोष्टींची मागणी केली असती, असा आरोप ट्रम्प यांनी केला. अमेरिकन माध्यमे आपल्या सरकारबाबत पक्षपात करीत असल्याचा आरोप याआधीही ट्रम्प यांनी केला होता.

अमेरिकेच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचेही माध्यमांनी समर्थन केले होते. पण आपल्यावर ही माध्यमे तुटून पडत आहे, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ‘मुर्खांकडून प्रसारित केल्या जाणार्‍या खोट्या बातम्या म्हणजे अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू ठरतो’, अशा घणाघाती शब्दात ट्रम्प यांनी आपल्या टीकाकारांना लक्ष्य केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अग्रगण्य अमेरिकन दैनिकामध्ये आलेल्या टीकेनंतर ट्रम्प यांनी जहाल प्रतिक्रिया नोंदविल्याचे दावे केले जातात. उत्तर कोरियाबरोबर वाटाघाटी करणार्‍या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवश्यक ती वैज्ञानिक माहिती नसल्याचा ठपका ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या या बातमीत ठेवण्यात आला होता. त्याला ट्रम्प यांनी आपल्या भाषेत उत्तर दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ट्रम्प अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर, त्यांचा माध्यमांशी संघर्ष होत राहिल, असे स्पष्ट संकेत मिळाले होते. अमेरिकन पत्रकारांच्या संघटनेने राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रातून या संघर्षाला नव्याने तोंड फुटले होते. आम्ही राष्ट्राध्यक्षांवर टीका करताना कचरणार नाही, तो आमचा मुलभूत अधिकार असल्याचा दावा पत्रकारांनी केला होता. तर अमेरिकेची माध्यमे खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत, पण आता या माध्यमांनी आपली विश्‍वासार्हता गमावली असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सातत्याने सांगत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info