सिरियाच्या ‘डेरा’मधील संघर्षामुळे ५० हजार बेघर

सिरियाच्या ‘डेरा’मधील संघर्षामुळे ५० हजार बेघर

बैरूत – गेल्या आठवड्याभरापासून सिरियाच्या दक्षिणेकडील ‘डेरा’ मध्ये सिरियन लष्कर व रशियाने सुरू केलेल्या हल्ल्यांमुळे जवळपास ५० हजार जनता बेघर झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला. यातील काही बेघर इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या दिशेने तर काही जॉर्डनच्या सीमारेषेसाठी रवाना झाले आहेत. पण सिरियातील विस्थापितांच्या या नव्या लोंढ्यासाठी आपल्या सीमारेषा बंद राहतील, अशी भूमिका जॉर्डनने स्वीकारली आहे. त्यामुळे सिरियन बेघरांचा नवा प्रश्‍न निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

‘डेरा’इस्रायल आणि जॉर्डनच्या सीमेजवळ असलेल्या ‘डेरा’ भागात सिरियन लष्कराने व्यापक मोहीम छेडली आहे. गेल्या मंगळवारपासून सिरियन लष्कराने ‘डेरा’मधील बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले. चार दिवसांपासून रशियन लढाऊ विमानांनीही हल्ले सुरू केल्यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढल्याचा दावा केला जातो. पण सिरियन लष्कर आणि बंडखोरांमध्ये पेटलेल्या या संघर्षामुळे हजारोजण निर्वासित झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघातील मानवाधिकार संघटनेने केला.

यापैकी काही निर्वासित इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या सीमारेषेसाठी रवाना झाले आहेत. इस्रायलच्या सीमारेषेजवळ कोणतीही भीती नसल्याचा दावा निर्वासितांपैकी काही जण करीत आहेत. तर निर्वासितांचा एक लोंढा जॉर्डनसाठी रवाना झाला आहे. याआधीही सिरियातील संघर्षात निर्वासित झालेले सहा लाख ६० हजार सिरियन नागरिक जॉर्डनच्या सीमाभागात दाखल झाले आहेत.

पण यापुढे सिरियातील निर्वासितांना आपल्या देशात प्रवेश नसेल, अशी भूमिका जॉर्डनने स्वीकारली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाने सिरियाच्या दक्षिणेकडील सीमारेषेच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्णय घ्यावे, असे आवाहन जॉर्डनने केले आहे. सिरियाच्या दक्षिणेकडील संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तवून जॉर्डनने हे आवाहन केले आहे. असे झाले तर निर्वासितांचा प्रश्‍न अधिकच चिघळू शकतो, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघ करीत आहे.

दरम्यान, सिरियन लष्कराने संघर्षबंदीचे उल्लंघन करून ‘डेरा’मध्ये कारवाई सुरू केल्याची टीका अमेरिका करीत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info