Breaking News

भारत व रशियामध्ये आठ महत्त्वपूर्ण करार संपन्न

नवी दिल्ली – ‘एस-400’ या प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेच्या करारासह भारत व रशियामध्ये आठ महत्त्वपूर्ण करार संपन्न झाले. यामध्ये अंतराळ, रेल्वे, अणुकार्यक्रम, वाहतूक तसेच रसायन क्षेत्रातील सहकार्य करारांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारतभेटीत झालेल्या या करारांमुळे भारत व रशियामधील सहकार्य अधिकच भक्कम झाल्याचे दिसते. दहशतवाद व अमली पदार्थांचा व्यापार याविरोधात एकजुटीने कारवाई करण्याचा निर्धार उभय देशांनी केल्याची घोषणा यावेळी रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली.

बदलत्या जागतिक परिस्थितीचा भारत आणि रशियामधील संबंधांवर परिणाम झाला नाही. म्हणूनच उभय देशांमधील मैत्रिपूर्ण संबंध आजही तितकेच प्रासंगिक ठरतात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत व रशियामधील संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भारत व रशियामधील मैत्रिपूर्ण संबंधांना दुसरा पर्याय असू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. रशियाबरोबरील भारताच्या या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांमध्ये आठ महत्त्वपूर्ण करार संपन्न झाले.

या करारांमध्ये ‘एस-400’ या रशियाच्या बहुचर्चित हवाई सुरक्षा यंत्रणेच्या कराराचा समावेश आहे. पाच अब्ज डॉलर्सच्या या करारानुसार भारत रशियाकडून ही हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करणार असून यासाठी अमेरिकेचा विरोध स्वीकारण्याची जोखीम भारताने पत्करली आहे. सदर यंत्रणेच्या व्यवहारावरून भारताला निर्बंधांच्या धमक्या देणार्‍या अमेरिकेचा सूर निवळल्याचे दिसू लागले आहे. रशियाबरोबर कुठल्याही स्वरुपाचे व्यवहार करणार्‍या देशांवर कठोर निर्बंध टाकणारा कायदा अमेरिकन संसदेने संमत केला होता. पण हा कायदा अमेरिकेच्या सहकारी देशांना असुरक्षित बनविण्यासाठी वापरला जाणार नाही, अशी ग्वाही अमेरिकेने दिली आहे.

दरम्यान, रशिया भारताला आण्विक क्षेत्रात अधिक सहकार्य करणार असून याबाबतच्या कृती आराखड्याचा करार संपन्न झाला आहे. याबरोबरच भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो रशियन अंतराळसंस्थेशी सहकार्य करून मानवी अंतराळ मोहिमेसाठी रशियन संस्था इस्रोला सहकार्य करणार आहे. याबरोबरच भारताची इंधन कंपनी ‘ओएनजीसी’ व रशियन इंधनकंपन्यांमध्येही सहकार्य करार संपन्न झाले आहेत. तसेच भारताच्या रसायन व खतनिर्मिती क्षेत्रामध्ये रशिया थेट गुंतवणूक करणार असून याबाबतच्या करारावरही स्वाक्षर्‍या पार पडल्या.

रुपया व रुबल यांच्यामधील व्यवहारांबाबत सखोल चर्चा करून याबाबतचे सहकार्य वाढविण्यावरही भारताचे पंतप्रधान मोदी व रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चर्चा पार पडली. आर्थिक, व्यापारी आणि संरक्षणविषयक सहकार्यात दोन्ही देशांच्या चलनाचा वापर करण्याची तयारी उभय देशांनी दाखविली आहे.

रशियावर अमेरिकेने कडक आर्थिक निर्बंध लादले असताना, रशियाने आपल्या इतर देशांबरोबरील व्यवहारातून अमेरिकन डॉलर बाजूला सारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रुपया व रुबलमधील व्यवहाराबाबत भारत व रशियामध्ये विकसित होत असलेले हे सहकार्य आर्थिक व राजकीयदृष्ट्या फार मोठी बाब ठरू शकते.

याबरोबर भारतातील गुंतवणूक वाढविण्यासाठी रशिया स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या तयारीत असल्याची माहितीही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या दौर्‍याच्या निमित्ताने समोर आली आहे. रेल्वे क्षेत्रातही भारतच्या विकासाला रशियाचे सहाय्य लाभणार असून आर्थिक व्यवहार व परराष्ट्र धोरणविषयक सल्लामसलतीवरही उभय देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. याबरोबरच इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर प्रकल्पाबाबतही भारत व रशियामध्ये एकमत झाले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info