Breaking News

हिंदी महासागर ते एडनच्या आखातापर्यंत इराणच्या ५८ विनाशिका तैनात – इराणच्या नौदलप्रमुखांची घोषणा

तेहरान – इराणची इंधन निर्यात शुन्यावर आणण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. मात्र इराणची इंधन निर्यात रोखली तर, आखातातून दुसर्‍या कुठल्याही देशाच्या इंधनाचा एकही थेंब बाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. हिंदी महासागरी क्षेत्रापासून ते एडनच्या आखातापर्यंत आपल्या नौदलाच्या सुमारे ५८ विनाशिका तैनात करून ही धमकी प्रत्यक्षात उतरविण्याची धमक आपल्याकडे असल्याचे इराणने दाखवून दिले आहे.

महिन्याभरापूर्वी अमेरिकेने इराणच्या इंधन निर्यातीवर लादलेले कठोर निर्बंध व इराणच्या नौदलाच्या आक्रमक हालचालींमुळे पर्शियन आखातातील तणाव वाढत चालला आहे. अमेरिकेने इराणची इंधन निर्यात रोखण्याचा प्रयत्न केलाच तर इतर कुठल्याही आखाती देशाचे इंधन पर्शियन आखाताबाहेर जाणार नसल्याची धमकी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी काही तासांपूर्वी दिली होती. पण रोहानी यांनी अमेरिका व आखातातील अमेरिकेच्या अरब मित्रदेशांना ही धमकी देण्याआधीच इराणच्या विनाशिकांनी पर्शियन आखाताभोवती कडे तयार केल्याचे उघड झाले आहे.

विनाशिका, तैनात, हसन रोहानी, नौदल, हिंदी महासागर, इराण, पाठलाग, इराण, पर्शियन आखात

इराणचे नौदलप्रमुख रेअर अ‍ॅडमिरल ‘हुसेन खानझादी’ यांनी इराणी वृत्तसंस्थेशी बोलताना दिलेल्या माहितीत, हिंदी महासागराच्या उत्तरेपासून ते एडनच्या आखातापर्यंत नौदलाच्या ५८ विनाशिका तैनात केल्याचे सांगितले. विनाशिकांची एवढी मोठी तैनाती इराणी इंधनवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी तसेच या सागरी क्षेत्रातील चाचेगिरी विरोधात असल्याचे खानझादी यांनी सांगितले. खानझादी यांनी अमेरिकेचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी सागरीसीमेच्या सुरक्षेसाठी आणि सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी ही तैनाती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याआधीच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या पथकाने होर्मुझच्या आखातात विनाशिका, गस्तीनौका आणि पाणबुड्यांच्या सहाय्याने मोठी मोर्चेबांधणी केली आहे. तर पर्शियन आखातातून प्रवास करणार्‍या आखाती देशांच्या इंधनवाहू जहाजांबरोबर अमेरिकी युद्धनौकांचाही इराणच्या या गस्तीनौकांनी पाठलाग केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे इराणने पर्शियन आखात ते एडनच्या आखातापर्यंत आपल्या विनाशिकांचे मोठे जाळे उभे केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, इराणच्या धमकीनंतर अमेरिकेची ‘युएसएस जॉन स्टेनिस’ ही विमानवाहू युद्धनौका आपल्या ताफ्यासह पर्शियन आखातासाठी रवाना झाली आहे. अमेरिकी युद्धनौकांचा ताफा येत्या शनिवारपर्यंत पर्शियन आखातात दाखल होईल, असे बोलले जाते. अशा परिस्थितीत एडनच्या आखातात तैनात असलेल्या इराणच्या विनाशिका अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेला आव्हान देऊ शकतात.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info