इराणच्या धमकीनंतरही सिरियातील हल्ले सुरू ठेवण्याची इस्रायलची घोषणा -सिरियातील हल्ल्यात इराणचा कमांडर ठार

इराणच्या धमकीनंतरही सिरियातील हल्ले सुरू ठेवण्याची इस्रायलची घोषणा -सिरियातील हल्ल्यात इराणचा कमांडर ठार

तेल अविव – आपल्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराणकडून इस्रायलचे हैफा शहर बेचिराख करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण इराणच्या या धमक्यांना आपण भीक घालत नसून यापुढेही सिरियातील इराणच्या ठिकाणांवरील इस्रायलचे हल्ले सुरूच राहतील, अशी घोषणा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अवीव कोशावी यांनी केली. याला काही तास उलटत नाही तोच सिरियातील ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचा वरिष्ठ कमांडर मारला गेल्याची माहिती समोर येत आहे.

इराणमध्ये अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येनंतर जहाल प्रतिक्रिया उमटत आहेत. थेट इराणमध्ये घुसून करण्यात आलेल्या आपल्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येनंतरही शांत राहणे म्हणजे आणखी हत्यांना परवानगी देण्यासारखे ठरते. तेव्हा हत्या घडविणाऱ्यांना लष्करी कारवाईद्वारे अद्दल घडवा, अशी मागणी इराणमध्ये जोर पकडत आहे. फखरीझादेह यांच्या हत्येचा आरोप इस्रायलने फेटाळला आहे. त्याचबरोबर इराण किंवा इराणसंलग्न गटांकडून इस्रायलवर हल्ल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे.

संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल कोशावी यांनी देखील रविवारी गोलान टेकड्यांच्या सिरिया सीमेला भेट दिल्यानंतर इराण व इराणसंलग्न गटांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला देश सज्ज असल्याचे म्हटले आहे. ‘सिरियातील इराणच्या मोर्चेबंदी विरोधात इस्रायलची कठोर कारवाई यापुढेही सुरू राहिल. इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या इराणच्या ठिकाणांवरील कारवाईसाठी इस्रायल पूर्ण सज्ज आहे’, असे कोशावी यांनी स्पष्ट केले. या भेटीत इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी सिरियाच्या गोलान भागात हल्ले चढविणाऱ्या इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

दरम्यान, ईशान्य सिरियाच्या ‘अल कईम’ शहरात रविवारी झालेल्या ड्रोनच्या हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचा वरिष्ठ कमांडर तसेच इतर दोन जवान मारले गेल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. इराकच्या सीमेजवळ असलेल्या ‘अल कईम’मधून कुद्स फोर्सेसच्या कमांडरची मोटार जात असताना हा हल्ला झाला. इराकच्या सीमेजवळ हा हल्ला झाल्यामुळे अमेरिकेने हा ड्रोन हल्ला चढविल्याची शक्यताही वर्तविण्यात येते.

मात्र कोशावी यांच्या घोषणेनंतर सिरियातील कुद्स फोर्सेसच्या कमांडरवर ही कारवाई झाल्याचे इस्रायली माध्यमे निदर्शनास आणून देत आहेत. काही दिवसांपूर्वी सिरिया-इराकच्या सीमेजवळील अल-बुकमल भागात इराणच्या तळांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमागे इस्रायल असल्याचा आरोप सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info