Breaking News

बांगलादेशच्या निवडणुकीत पंतप्रधान शेख हसिना यांचा दणदणीत विजय

ढाका – बांगलादेशच्या निवडणुकीत पंतप्रधान शेख हसिना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाने ३०० पैकी २६६ जागांवर विजय मिळविला आहे. अवामी लीगशी आघाडी करणार्‍या ‘जातिया पार्टी’ने २१ जागा जिंकल्या. यामुळे बांगलादेशच्या या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएनपी) भुईसपाट झाला असून या पक्षाला केवळ सहा जागांवर विजय मिळाला आहे. या पराभवाचे खापर ‘बीएनपी’ने निवडणुकीतील तथाकथित गैरव्यवहारावर फोडले असून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. 

रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत बांगलादेशात ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात १८ जणांचा बळी गेला आहे. रविवारी रात्रीपासून मतमोजणी सुरू झाली व तेव्हापासूनच या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होत गेला. संसदेच्या ३०० जागांपैकी २९८ जागांवर निवडणूक पार पडली व यातील २६६ जागा ‘अवामी लीग’ने जिंकल्या असून ‘जातिया’ पक्षासह केलेल्या अवामी लीगच्या आघाडीला २८७ जागा मिळाल्या आहेत. हा जबरदस्त विजय मिळवून पंतप्रधान शेख हसिना यांचा ‘अवामी लीग’ सलग तिसर्‍यांदा बांगलादेशच्या सत्तेवर आला आहे. 

२०१४ साली झालेल्या निवडणुकीवर ‘बीएनपी’ने बहिष्कार टाकला होता. त्या निवडणुकीतही ‘अवामी लीग’ला जबरदस्त यश मिळाले होते. मात्र ‘बीएनपी’ने हा पराभव अमान्य केला असून या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी ‘बीएनपी’ने केली आहे. मात्र या निवडणुकीत ‘अवामी लीग’ यशस्वी ठरेल, असा दावा बांगलादेशातील सर्वच वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्या करीत होत्या. त्यामुळे शेख हसिना यांना मिळालेले हे यश अपेक्षित असल्याचे मानले जाते. 

शेख हसिना यांना मिळालेला हा विजय भारतासाठी सुचिन्ह ठरत असून यामुळे बांगलादेशचा भारताच्या विरोधात वापर करू पाहणार्‍या पाकिस्तान व चीन या देशांना धक्का बसला आहे. शेख हसिना यांची सत्ता उलथण्यासाठी पाकिस्तान बांगलादेशातील कट्टरपंथीयांचा वापर करून दहशतवादी कारवाया करीत असल्याचेही उघड झाले होेते. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या देशात पाकिस्तानच्या या कारवाया खपवून घेणार नाही, असे बजावले होते.

 English हिंदी 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info