Breaking News

सुदानमधील लष्करी उठावात राष्ट्राध्यक्ष बशिर यांची हकालपट्टी तीन महिन्यांच्या आणीबाणीची घोषणा

खार्तुम – गुरुवारी सुदानमध्ये घडलेल्या वेगवान घडामोडींमध्ये लष्कराने उठाव करून राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशिर यांची हकालपट्टी केल्याचे समोर आले आहे. बशिर यांना लष्कराने ताब्यात घेतले असून सुरक्षित स्थळी नेल्याची माहिती देशाचे संरक्षणमंत्री व लष्करप्रमुख जनरल अहमद अवाद इब्न औफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात तीन महिन्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली असून दोन वर्षात निवडणुका घेऊन नव्या सरकारची स्थापना करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले आहे. मात्र सुदानमध्ये आंदोलन करणार्‍या गटांनी लष्कराच्या निवेदनावर नाराजी दर्शविली असून निदर्शने कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

सुदानमध्ये गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष बशिर यांच्या राजवटीविरोधात आंदोलन सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष बशिर यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करून ते मोडून काढण्यावर भर दिला होता. सुरक्षायंत्रणांच्या कारवाईदरम्यान ५०हून अधिक आंदोलनकर्त्यांचा बळी गेला होता. गेल्या आठवड्यात आंदोलनकर्त्यांनी निदर्शनांची धार अधिकच वाढवित थेट लष्करी मुख्यालयासह राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर धडक मारली. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी पहाटे लष्कराने अचानक उठाव केल्याचे वृत्त समोर आले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष बशिर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांना त्यांच्या निवासस्थानात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. बशिर यांच्या ‘नॅशनल कॉंग्रेस पार्टी’च्या मुख्यालयावर धाडी टाकण्यात आल्या असून अनेक वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी वृत्तवाहिनीसह महत्त्वाच्या कार्यालयांवरही लष्कराने ताबा मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी देशाचे संरक्षणमंत्री अहमद अवाद इब्न औफ यांनी पत्रकार परिषद घेऊन बशिर यांच्या हकालपट्टीची माहिती देऊन आणीबाणीची घोषणा केली. या घडामोडींदरम्यान सुदानच्या जनतेने रस्त्यावर उतरून जल्लोष करण्यास सुरुवात केल्याचे फोटो समोर आले आहेत.

मात्र बशिर यांच्याविरोधात आंदोलन सुरू करणार्‍या गटांनी संरक्षणमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या घोषणांवर नाराजी व्यक्त केली असून, हा खरा बदल नसल्याचा इशारा दिला. फक्त एक चेहरा बदलला आहे, बाकी यंत्रणा व त्यांना हाताळणारे चेहरे तेच आहेत, अशी टीका करून जनतेने आंदोलन थांबवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात सुदानमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू होण्याची शक्यता असून त्यातून अराजकसदृश?स्थितीची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लष्कराने हकालपट्टी करून नजरकैदेत ठेवलेले ‘ओमर अल-बशिर’ गेले २६ वर्षे सत्तेवर होते. ‘दर्फूर’ भागातील संघर्ष आणि ‘साऊथ सुदान’ची निर्मिती यामुळे बशिर प्रचंड वादग्रस्त ठरले होते. गेल्या काही वर्षात त्यांची चीनसह इराण, तुर्की व इजिप्तबरोबरील वाढती जवळीक आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. इंधन व लष्कराच्या जोरावर दीर्घकाळ सत्ता ताब्यात ठेवणार्‍या बशिर यांची सत्तेवरून झालेली हकालपट्टी हा ‘अरब स्प्रिंग-२’चा भाग असावा, असा दावा काही विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info