Breaking News

हवाई हद्दीत घुसखोरी करणार्‍या रशियन विमानावर दक्षिण कोरियाचे ‘वॉर्निंग शॉट्स’

सेऊल – मंगळवारी पहाटे चीन आणि रशियाच्या लष्करी विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केले. अवघ्या काही तासात चारवेळा झालेल्या या घुसखोरीमुळे संतापलेल्या दक्षिण कोरियाने आपली लढाऊ विमाने रवाना करून रशियन विमानावर ३६० वॉर्निंग शॉट्स झाडले. यापुढे आपल्या हद्दीचे उल्लंघन केले तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दक्षिण कोरियन संरक्षण मंत्रालयाने दिला. दक्षिण कोरियाचे हे आरोप रशियाने नाकारले आहेत.

चीन आणि रशियाच्या हवाईदलाचा युद्धसराव सुरू असताना ही घुसखोरी झाल्याचा दावा दक्षिण कोरियन अधिकार्‍यांनी केला आहे. सुरुवातीला चीनच्या दोन ‘एच-६ बॉम्बर्स’ विमानांनी मंगळवारी सकाळी पावणे सात ते पावणे आठ या तासाभराच्या कालावधीत दोन वेळा दक्षिण कोरियन हद्दीतून प्रवास केला. या घुसखोरीनंतर चीनच्या बॉम्बर्स विमानांनी किमान २४ मिनिटे दक्षिण कोरियाच्या ‘एअर डिफेन्स आयडेन्टिफिकेशन झोन’च्या क्षेत्रात घिरट्या घातल्या. यानंतर पुढच्या तासाभरात रशियाच्या ‘ए-५० कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल’ विमानाने दक्षिण कोरियन हद्दीत दोन वेळा प्रवेश केला.

दक्षिण कोरियाच्या वायुसेनेने याची दखल घेऊन रशियन विमानाच्या वैमानिकाला ३० वेळा वॉर्निंग दिली. पण प्रतिसाद न मिळाल्यानंतर दक्षिण कोरियाने ‘एफ-१५एफ’ आणि ‘केएफ-१६’ या लढाऊ विमानांना रवाना केले. या दोन्ही विमानांनी रशियन विमानाच्या दिशेने ३६० वॉर्निंग शॉट्स फायर केले. या वॉर्निंग शॉट्सनंतर रशियन विमानाने पुन्हा दक्षिण कोरियन हवाईहद्दीजवळून प्रवास केला नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

तसेच ‘येत्या काळात दक्षिण कोरियाच्या हवाईहद्दीचे उल्लंघन झाले तर अधिक कठोर कारवाई करून प्रत्युत्तर दिले जाईल. रशियाने याबाबत काळजी घ्यावी’, असा इशारा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिला. रशियन लष्करी विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाईहद्दीत प्रवेश करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. याआधी चीन, उत्तर कोरियाच्या विमानांनी घुसखोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या.

दक्षिण कोरियाचे हे आरोप रशियाने फेटाळले आहेत. रशियाच्या लष्करी विमानाने दक्षिण कोरियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला नसल्याचे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाच्या दोन ‘टू-९५ स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स’ विमानांनी आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रातून प्रवास केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे.

दरम्यान, रशियन विमानांच्या दक्षिण कोरियन क्षेत्रातील घुसखोरीवर जपाननेही टीका केली आहे. अशा कारवाईमुळे आपल्या देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, याकडे जपानच्या सरकारने लक्ष वेधले आहे. जपानमध्ये अमेरिकेचे लष्कर, नौदल आणि वायुसेनेचे मोठे तळ आहेत. त्यामुळे चीन व रशियन विमानांच्या या क्षेत्रातील घुसखोरी अत्यंत गंभीर बाब ठरत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info