युरोपात सुमारे ५० लाख अवैध निर्वासित – ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल

युरोपात सुमारे ५० लाख अवैध निर्वासित – ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल

वॉशिंग्टन – युरोपिय देशांमध्ये घुसून बेकायदेशीररित्या मुक्काम ठोकणार्‍या निर्वासितांची संख्या सुमारे ५० लाखांच्या आसपास असल्याचा अहवाल ‘प्यू रिसर्च सेंटर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया व इराकसारख्या देशांमधून आलेल्या निर्वासितांचा हिस्सा ४० टक्क्यांहून अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी काही दिवसांपूर्वीच आखातातील ३० लाख निर्वासितांना युरोपिय देशांमध्ये घुसविण्याची धमकी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर युरोपातील निर्वासितांची आकडेवारी लक्ष वेधून घेणारी ठरते.

२०१५ सालापासून युरोपात मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे घुसत आहेत. सुरुवातीच्या काळात काही उदारमतवादी युरोपिय देशांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे लोंढे नियंत्रणाबाहेर गेले असून त्याचे विपरित परिणाम आता युरोपिय देशांना सहन करावे लागत आहेत. निर्वासितांच्या मुद्यावरून युरोपिय देशांमध्ये प्रचंड मतभेद व दुफळी निर्माण झाली असून काही देशांनी निर्वासितांवर पूर्ण बंदी घालत त्यांना रोखण्यासाठी आपल्या सीमेवर लष्करी तैनातीही केली आहे. मात्र तरीही निर्वासितांची घुसखोरी चालू असून त्याविरोधात केलेल्या सर्व उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत.

गेल्या काही महिन्यात युरोपचे प्रवेशद्वार असणार्‍या ग्रीसमध्ये पुन्हा एकदा निर्वासितांचे लोंढे वाढू लागले असून त्यामागे तुर्कीच्या कुरापती कारणीभूत असल्याचे मानले जाते. तुर्कीने सिरियातील कारवाईसह घेतलेल्या काही निर्णयांना युरोपिय देशांनी विरोध केला असून शस्त्रसहाय्य रोखले आहे. त्याचवेळी निर्वासितांबाबत करार करताना युरोपिय महासंघाने दिलेले वचनही पाळले नसल्याचा आरोप तुर्कीने केला आहे. त्यामुळे भडकलेल्या तुर्कीने निर्वासितांना मोकळे सोडल्याचे सांगण्यात येते.

‘प्यू रिसर्च सेंटर’ने दिलेल्या अहवालात, निर्वासितांचे लोंढे सर्वाधिक प्रमाणात जर्मनी, इटली व फ्रान्समध्ये घुसल्याचे नमूद करण्यात आले आहे. जर्मनीत घुसलेल्या अवैध निर्वासितांची संख्या जवळपास १२ लाखांहून अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले. तर इटलीत घुसलेल्या निर्वासितांची आकडेवारी सात लाखांहून अधिक आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info