Breaking News

बेल्जियममध्ये चिनी हेरांच्या हालचाली वाढल्या – युरोपमध्ये प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न

ब्रुसेल्स/बीजिंग – अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत कारभारात चीनच्या हस्तक्षेपाची प्रकरणे उघड होत असतानाच आता युरोपातील चिनी हेरगिरीची माहितीही समोर येऊ लागली आहे. बेल्जियमच्या गुप्तचर यंत्रणांनीही त्याला दुजोरा दिला असून शीतयुद्धाच्या कालावधीतील हेरांपेक्षाही अधिक चिनी हेर वावरत असून त्यांची संख्या रशियन हेरांपेक्षा अधिक असल्याची कबुली दिली. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये ‘युरोपिय महासंघ’ व ‘नाटो’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची असलेली मुख्यालये आणि विविध देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांचा सातत्याने असलेला वावर हे चीनच्या वाढत्या हालचालींचे कारण असल्याचे सांगण्यात येते.

काही महिन्यांपूर्वी जर्मनीतील एका नियतकालिकाने एकट्या बेल्जियममध्ये चीनचे तब्बल २५० हेर कार्यरत असल्याचा दावा केला होता. त्यावर चीनच्या युरोपिय महासंघातील राजनैतिक कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जर्मन नियतकालिकाचा दावा तथ्यहीन असल्याचा आरोपही चीनच्या राजनैतिक कार्यालयाकडून करण्यात आला होता. मात्र या अहवालापूर्वी बेल्जियममध्ये घडलेल्या घटना चीनच्या हेरगिरीच्या कारवायांकडे लक्ष वेधणार्‍या ठरल्या आहेत.

२०१८ साली बेल्जियममध्ये अटक झालेल्या ‘शु यान्जुन’चे प्रकरण चीनकडून बेल्जियमसह युरोप व अमेरिकेत सुरू असणार्‍या हेरगिरीचे छोटेसे टोक मानले जाते. चीनची गुप्तचर यंत्रणा ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’चा अधिकारी असणार्‍या ‘शु यान्जुन’ला एप्रिल २०१८मध्ये ब्रुसेल्समध्ये अटक करण्यात आली. एका अमेरिकी इंजिनिअरकडून ‘जीई ऍव्हिएशन’ या बहुराष्ट्रीय कंपनीची गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न या आरोपांखाली ही अटक झाली होती.

या घटनेनंतर अमेरिका तसेच युरोपमधील यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या असून चिनी हेरांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अमेरिकन यंत्रणांनी देशाच्या विविध भागांमधून चीनसाठी हेरगिरी करणार्‍या काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे. युरोपिय देशांमध्ये अद्याप अशी मोठी कारवाई सुरू झाली नसली तरी युरोपियन यंत्रणा सतर्क झाल्याचे समोर येत आहे.

गेल्याच महिन्यात बेल्जियमने चीनच्या ‘कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट’च्या ब्रुसेल्समधील संचालकाला वास्तव्याचा परवाना नाकारून त्यांची हकालपट्टी केली होती. ‘शिनिंग सॉंग’ नावाचा हा अधिकारी चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करीत असल्याचा आरोप बेल्जियमच्या ‘स्टेट सिक्युरिटी सर्व्हिस’कडून करण्यात आला होता. बेल्जियममध्ये प्रवेश नाकारला गेल्यामुळे सॉंग यांना युरोपच्या ‘शेन्गेन’ यंत्रणेचा भाग असणार्‍या कोणत्याही देशात प्रवेश मिळणार नसल्याचेही बेल्जियन यंत्रणांनी स्पष्ट केले.

बेल्जियममधील अस्थिर राजकीय व्यवस्था व चीनच्या सत्ताधार्‍यांकडून या देशात करण्यात येणारी प्रचंड गुंतवणूक या पार्श्‍वभूमीवर चीनच्या हेरगिरीची प्रकरणे समोर येणे धक्कादायक ठरते. गेल्या काही वर्षात आर्थिक सामर्थ्याच्या बळावर चीन युरोपातील काही देशांना आपल्या बाजूने वळवून युरोपात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप होत आहेत. ग्रीससह पूर्व युरोपिय देशांमधील चीनची प्रचंड गुंतवणूक, इटली सारख्या देशाबरोबर केलेले करार आणि चीनच्या मुद्यावर या देशांकडून महासंघात घेण्यात येणारी भूमिका यातून चीनचे फुटीचे हे धोरण उघड होत आहे. बेल्जियमसारख्या देशातील हेरांचे जाळे चीनच्या या धोरणाला पुष्टी देणारे ठरते. 

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील माजी गुप्तचर प्रमुखांनी चीनकडून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कारवायांचा पर्दाफाश केला होता. त्यात चीनची सत्ताधारी राजवट विविध माध्यमांमधून देशाची राजकीय व्यवस्थाच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाकडे आश्रय मागणार्‍या चीनच्या एका हेरानेही चिनी यंत्रणांच्या कारस्थानांची माहिती दिली होती. या सर्व घटना, चीनची सत्ताधारी राजवट येनकेन प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले वर्चस्व वाढविण्यासाठी कशा प्रकारे पावले टाकत आहे, याची जाणीव करून देणार्‍या ठरतात.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info