Breaking News

२००२-०३ साली आलेल्या ‘सार्स’च्या तुलनेत ‘वुहान कोरोनाव्हायरस’साथीतील बळींची संख्या वाढली

बीजिंग – चीनमध्ये गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीत बळी पडलेल्यांची संख्या ८१३ झाली आहे. यात चीनमधील ८११ जणांचा समावेश आहे. शनिवारी २४ तासांच्या कालावधीत ८९ नव्या बळींची नोंद झाली असून जगभरातील रुग्णांची आकडेवारी ३७ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. या नव्या आकडेवारीने २००२-०३ साली आलेल्या ‘सार्स’च्या साथीला मागे टाकले असून या ‘सार्स’मुळे ७७४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान चीनमधील यंत्रणांनी ‘वुहान कोरोनाव्हायरस’चा संसर्ग तीन वेगवेगळ्या प्रकारांनी होत असल्याचा दावा केला आहे.

चीनमधून २००२ साली ‘सिव्हिअर ऍक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ची(सार्स) साथ सुरू झाली होती. जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत ही साथ जगातील २०हून अधिक देशांमध्ये फैलावली होती. ‘कोरोनाव्हायरस’ प्रकारातील विषाणूचा भाग असणार्‍या या आजाराने ७७४ जणांचा मृत्यू झाला होता. या साथीची हाताळणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे चीनवर प्रचंड टीकाही झाली होती. या पार्श्‍वभूमीवर ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची साथ अधिक भयावह व मोठी व्याप्ती असणारी असून त्याने ‘सार्स’ला मागे टाकल्याचे नव्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.

‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीचे परिणाम चीनसह आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्र व अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. आशियाई देशांसह अमेरिका व युरोपमधील उद्योगक्षेत्राला चीनमधील साथीचे फटके बसण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसल्याचे सांगण्यात येत असून अमेरिकेसह युरोप व आशियाई देशांमधील चिनी पर्यटकांची बहुतांश बुकिंग रद्द झाली आहेत. यामुळे होणारे नुकसान अब्जावधी डॉलर्सच्या घरात जाऊ शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे.

चीन ही जगाची फॅक्टरी म्हणून ओळखण्यात येत असून गेल्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक तसेच धातू व औषध उद्योगातील उत्पादनाचे केंद्र बनले आहे. ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या पार्श्‍वभूमीवर चीनने शहरे लॉकडाऊन करतानाच मोठे कारखाने व उद्योगही बंद ठेवले आहेत. त्याचे परिणाम इतर देशातील उद्योगांवर होण्यास सुरुवात झाली असून चीनकडून होणारी आयात जवळपास बंद पडण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनला कारखाने सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही केल्याचे समोर आले आहे.

मात्र चीनने ‘वुहान कोरोनाव्हायरस’वर नियंत्रण मिळेपर्यंत शहरांबरोबरच कारखाने व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चीनमधील बहुतांश कारखाने फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद राहतील, असे सांगण्यात येते. त्याचवेळी चीन सरकारने ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीचा मुकाबला करण्यासाठी १० अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मलेशियाने चीनमधून येणार्‍या प्रवाशांच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ची व्याप्ती वाढवित असल्याची घोषणा केली आहे. या आठवड्यात सिंगापूरमध्ये सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय हवाई प्रदर्शनातून जवळपास ७० कंपन्यांनी माघार घेतल्याचेही समोर आले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info