Breaking News

इस्रायलने सिरियातील हिजबुल्लाहच्या रासायनिक शस्त्रांचा तळ नष्ट केला

जेरुसलेम/दमास्कस – सोमवारी रात्री इस्रायलने सिरियात केलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा रासायनिक शस्त्रांचा तळ उद्ध्वस्त झाला आहे. इस्रायलमधील एका कंपनीने या तळाचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. या फोटोग्राफ्समुळे हा हल्ला इस्रायलने केल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाला असून सिरियन यंत्रणांचा खोटेपणाही उघड झाला आहे.

सिरियातील अलेप्पो व देर एझोर भागात इस्रायलने हवाईहल्ले चढविल्याचा दावा सिरियन संघटनेने केला होता. या हल्ल्यांमध्ये रासायनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रयोगशाळा व इराणकडून मिळालेल्या शस्त्रांचा साठा असणारे गोदाम यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. सीरियन वृत्तसंस्थेने काही हल्ले हवाईसुरक्षा यंत्रणांनी परतविल्याचाही दावा केला होता.

मात्र इस्रायलकडून या हल्ल्यांबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. पण ‘इमेजसॅट इंटरनॅशनल’ या इस्रायली कंपनीने थेट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून हल्ले झाल्याचे पुरावेच उघड केले आहेत. या फोटोग्राफ्समधून त्या जागेवर असलेल्या इमारतीची मोठी हानी झाल्याचे स्पष्ट दिसून येते. फोटोग्राफ्स बरोबर दिलेल्या माहितीत कंपनीने हल्ला झालेली इमारत ‘मिसाईल फॅक्टरी’ असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी सोमवारी झालेल्या हल्ल्याने फॅक्टरीची मोठी हानी झाली असून ती जागा आता निरुपयोगी झाल्याचा दावा केला.

काही अरब प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हल्ला झालेला तळ रासायनिक शस्त्रांचा होता. या तळाच्या माध्यमातून सीरिया आपल्याकडील रासायनिक शस्त्रांसंदर्भातील संशोधन इराणला पुरवीत होता. याच संशोधनाचा वापर इराण हिजबुल्लाहच्या सहाय्यासाठी करीत होता. पाश्चात्य गुप्तचर संघटनांकडूनही याबाबत दावे करण्यात आले होते.

गेल्या शुक्रवारीही इस्रायलने सिरियाच्या होम्समधील क्षेपणास्त्र तळाला लक्ष्य केले होते. हा तळही इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा होता, असे समोर आले होते. सोमवारी पुन्हा सिरियातील इराणच्या तळावर हल्ले चढवून इस्रायलने आपले आक्रमक इरादे स्पष्ट केल्याचे दिसत आहे.

इस्रायलने शुक्रवार तसेच सोमवारी झालेल्या हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र ‘इमेजसॅट इंटरनॅशनल’ या कंपनीचे इस्रायलच्या अंतराळ व संरक्षण क्षेत्राशी असलेले संबंध लक्षात घेता फोटोग्राफ्स व दिलेली माहिती महत्त्वाची ठरते. गेल्याच आठवड्यात इस्रायलचे संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांनी, इस्रायल सिरियातील इराणसंलग्न गटांवर कारवाई कायम ठेवणार असून इराणला सिरियातून बाहेर हाकलल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे बजावले होते. त्यानंतर इराणसंलग्न दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या तळांवर झालेले हल्ले संरक्षणमंत्री बेनेट यांच्या वक्तव्याला दुजोरा देत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info