चीनच्या लढाऊ विमानांकडून तैवानच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न – तैवानने चिनी विमानांना पिटाळले

चीनच्या लढाऊ विमानांकडून तैवानच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न – तैवानने चिनी विमानांना पिटाळले

तैपेई/बीजिंग – अमेरिका व तैवानच्या वाढत्या संरक्षण सहकार्याने बिथरलेल्या चीनने तैवानला इशारे देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याभरात चीनच्या लढाऊ तसेच टेहळणी विमानांनी तीनदा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तैवानकडून चीनची विमाने सातत्याने माघारी पिटाळण्यात येत असतानाही सुरू असलेले हे प्रयत्न लक्ष वेधून घेणारे ठरतात.

घुसखोरीचे प्रयत्न, लढाऊ विमान, तैवान

गेल्या मंगळवारी चीनच्या सुखोई-30 लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चिनी लढाऊ विमानांना माघारी पिटाळल्यानंतरही शुक्रवारी व मंगळवारी चिनी विमानांनी पुन्हा तैवानच्या ‘एअर डिफेन्स झोन’मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी चीनचे टेहळणी विमान ‘वाय८’ने तैवानच्या नैऋत्य दिशेकडून हवाई हद्दीत घुसखोरी केली. त्यानंतर मंगळवारी चीनचे लढाऊ विमान ‘जे१०’ नेही याच भागातून घुसखोरी केल्याचे तैवानकडून सांगण्यात आले.

दोन्ही वेळेस तैवानने सुरुवातीला चिनी विमानांना वॉर्निंग दिली व नंतर लढाऊ विमाने धाडून त्यांना माघारी पिटाळले. एका आठवड्याच्या कालावधीत तीनदा चीनच्या विमानांनी तैवानच्या एकाच भागातून घुसखोरीचा प्रयत्न करणे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. चिनी युद्धनौका व विमानांनी यापूर्वीही तैवानच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले असले तरी त्यावेळी जागा वेगवेगळ्या होत्या.

चीनच्या या घुसखोरीच्या प्रयत्नांमागे अमेरिका व तैवानमधील वाढते संरक्षण सहकार्य आणि कम्युनिस्ट राजवटीचे वर्चस्ववादाचे धोरण कारणीभूत असल्याचे मानले जाते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनने साऊथ चायना सी ताब्यात घेण्यासाठी कारवाया सुरू केल्या असून हॉंगकॉंग व तैवानसाठीही जोरदार हालचाली सुरू आहेत. तैवानच्या मुद्यावरून सध्या अमेरिका व चीनमध्ये प्रचंड तणाव असून चीनचे माजी लष्करी अधिकारी व माध्यमे तैवानवर हल्ल्याचीही मागणी करीत आहेत.

घुसखोरीचे प्रयत्न, लढाऊ विमान, तैवान

चीनच्या या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिकेने आपल्या तीन विमानवाहू युद्धनौका एकाच वेळी इंडो पॅसिफिक सागरी क्षेत्रात तैनात केल्या आहेत. त्यातील दोन विमानवाहू युद्धनौका सध्या तैवानचे आखात व साऊथ चायना सी क्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते. या विमानवाहू युद्धनौकांच्या तैनातीपूर्वी अमेरिकेने आपली एक प्रगत विनाशिका काही दिवसांपूर्वी तैवाननजीक गस्तीसाठी पाठविली होती.

या महिन्याच्या सुरुवातीला तैवान अमेरिकेकडून हार्पून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी करत असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यापूर्वी अमेरिकेने तैवानला टॉर्पेडो देण्यास मान्यता दिल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून सुरू असलेल्या या वाढत्या हालचालींनी चीनची सत्ताधारी राजवट बिथरली असून विमानांची सातत्याने होणारी घुसखोरी त्याची प्रतिक्रिया असल्याचे दिसत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info