रशियाचा युक्रेनच्या राजधानीसह इतर भागांमध्ये क्षेपणास्त्र तसेच ड्रोन्सचा हल्ला

- युक्रेननेही रशियाच्या तीन प्रांतांना लक्ष्य केले

मॉस्को/किव्ह – गुरुवारी रात्री रशियाने युक्रेनी राजधानी किव्हसह मध्य तसेच उत्तर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र व ड्रोनहल्ले चढविले. या महिन्यात राजधानी किव्हसह इतर भागांवर हल्ला करण्याची ही बारावी वेळ ठरते. रशिया मोठे हल्ले करीत असतानाच युक्रेननेही गेल्या २४ तासांमध्ये रशियाच्या तीन प्रांतांमध्ये ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे समोर आले. या हल्ले-प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमधील संघर्ष अनेक दशके सुरू राहू शकतो, असे सांगून खळबळ उडविली आहे.

क्षेपणास्त्र

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास रशियाने युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली. युक्रेनी राजधानी किव्ह, मध्य युक्रेनमधील डिनिप्रिपेट्रोव्हस्क प्रांत तसेच उत्तरेतील खार्किव्ह प्रांताला लक्ष्य करण्यात आले. डिनिप्रिपेट्रोव्हस्कमधील आघाडीचे शहर असणाऱ्या डिनिप्रो शहरात पाच क्रूझ क्षेपणास्त्रांसह सहा आत्मघाती शाहेद ड्रोन्सचा मारा करण्यात आला. खार्किव्ह प्रांतात ‘एस-३००’ व ‘एस-४००’ क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. तर राजधानी किव्हमध्ये ‘केएच-१०१’ व ‘केएच-५५५’ या क्षेपणास्त्रांसह आत्मघाती ड्रोन्सचा मारा झाल्याचे स्थानिक यंत्रणांनी सांगितले.

क्षेपणास्त्र

डिनिप्रोमध्ये झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या शहरावरील हल्ल्यात एका वैद्यकीय केंद्रावर हल्ला झाल्याचा दावा युक्रेनसह पाश्चिमात्य माध्यमांनी केला आहे. राजधानी किव्हमध्ये नागरी वस्तीवर हल्ले झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र रशियाच्या संरक्षण विभागाने युक्रेनी लष्कराचा शस्त्रसाठा तसेच ‘लॉजिस्टिक सेंटर्स’ना लक्ष्य केल्याची माहिती दिली आहे. मे महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांमधून रशियन संरक्षणदलांनी आपली व्यापक तसेच दीर्घकालिन हल्ल्यांची क्षमता सिद्ध केल्याचा दावा रशियन विश्लेषक व सोशल मीडियाकडून करण्यात येत आहे.

क्षेपणास्त्र

दरम्यान, रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांना युक्रेनही प्रत्युत्तर देत असल्याचे दिसत आहे. सोमवारी युक्रेनसमर्थक गटांनी रशियाच्या बेलगोरोदमध्ये घुसखोरी करून मोठा हल्ला चढविला होता. त्यानंतर युक्रेनने गेल्या २४ तासांमध्ये रशियातील तीन प्रांतांना लक्ष्य केले आहे. यात बेलगोरोदसह क्रास्नोडर क्राय व रोस्टोव्ह प्रांताचा समावेश आहे. क्रास्नोडर क्रायमध्ये दोन ड्रोन्सनी हल्ला केल्याचे समोर आले. यात एका इमारतीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तर रोस्टोव्ह प्रांतात क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न झाला. बेलगोरोदमध्ये तोफा व रॉकेटस्‌‍चा मारा झाल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

हे हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमधील संघर्ष दीर्घकाळपर्यंत सुरू राहण्याचे संकेत देऊन खळबळ उडविली आहे. ‘रशिया-युक्रेन संघर्ष बराच काळ चालू राहणार आहे. कदाचित अनेक दशकांपर्यंत हा सुरू राहू शकतो’, असे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी सांगितले. किव्हमध्ये सध्याची राजवट असेपर्यंत काही काळ संघर्षबंदी, पुन्हा संघर्ष असे चक्र सुरूच राहिल असा दावा मेदवेदेव्ह यांनी केला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info