Breaking News

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी जपानकडून ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स’ तैनात

Patriot, Japan, china, चीन, जपान, पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स

टोकियो – चीनकडून भारतीय सीमेनजीक सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर जगातील इतर देशांनी चीन विरोधातील आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जपानने आपल्या संरक्षणतळांवर ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स’ यंत्रणा तैनात करण्यास सुरुवात केली असून या महिन्याच्या अखेरपर्यंत ही तैनाती पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनने गेल्या काही महिन्यात जपाननजीकच्या हद्दीतही आपल्या कारवाया वाढवल्या असून ‘पॅट्रिऑट मिसाईल’ यंत्रणेची तैनाती त्याला प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नांचा भाग दिसत आहे.

चीन, जपान, पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स

गेल्या महिन्यात चीनने आपली ‘लिओनिंग’ ही विमानवाहू युद्धनौका व ‘स्ट्राईक ग्रुप’ जपाननजीकच्या ईस्ट चायना सी क्षेत्रात गस्तीसाठी धाडली होती. त्यापूर्वी चीनच्या काही लढाऊ विमानांनी जपानच्या हवाईहद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केल्याचे वृत्तही समोर आले होते. जपानमधील अमेरिकी संरक्षणतळाच्या प्रमुखांनीही चीनच्या कारवाया वाढल्याकडे लक्ष वेधले होते. या सर्व पार्श्वभूमीवर जपानने क्षेपणास्त्र तैनातीसाठी सुरू केलेल्या हालचाली महत्त्वाच्या ठरतात.

चीन, जपान,

जपानने आपल्या चार संरक्षणतळांवर ‘पॅट्रिऑट पीएसी-३ एमएसई एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम’ तैनात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत ही तैनाती पूर्ण होईल असे सांगण्यात येते. क्षेपणास्त्रांबरोबरच लष्करी तुकड्यांची तैनातीही वाढविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चीनकडून वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जपानने गेल्या काही वर्षात आपली संरक्षण सज्जता वाढविण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. त्यानुसार जपानने आपले संरक्षण धोरण बदलले असून संरक्षणखर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. नवी लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र यंत्रणा, विनाशिका, पाणबुड्या यांच्या खरेदीबरोबरच विमानवाहू युद्धनौका विकसित करण्याचे संकेतही जपानकडून देण्यात आले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info