‘हॉंगकाँग’वरून चीनने गंभीर परिणामांची तयारी ठेवावी – युरोपिय महासंघाचा इशारा

‘हॉंगकाँग’वरून चीनने गंभीर परिणामांची तयारी ठेवावी – युरोपिय महासंघाचा इशारा

ब्रुसेल्स/बीजिंग – हॉंगकॉंगवर सुरक्षा कायदा जबरदस्तीने लादण्याच्या प्रयत्नांमुळे चीनची चांगलीच कोंडी होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘जी७’ देशांच्या गटाने या मुद्द्यावर चीनला फटकारल्यानंतर आता युरोपीय महासंघही आक्रमक झाला आहे. हॉंगकॉंग हा आमच्यासाठी तीव्र चिंतेचा मुद्दा असून चीनने कायदा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यासाठी अत्यंत गंभीर परिणाम भोगण्याची तयारी ठेवा, असा खरमरीत इशारा महासंघाने चीनला दिला. गेल्याच आठवड्यात युरोपियन संसदेने हाँगकाँगच्या मुद्द्यावर चीनला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची धमकी दिली होती.

शुक्रवारी युरोपियन संसदेने हॉंगकॉंगच्या मुद्द्यावर चीनविरोधातील ठरावाला मंजुरी दिली होती. ठरावात चीनने हॉंगकॉंगमध्ये नवा सुरक्षा कायदा लागू केल्यास, युरोपिय महासंघ चीनच्या सत्ताधारी राजवटीला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचेल, असे बजावण्यात आले होते. चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी युरोपने आर्थिक पातळीवरून चीनवर दबाव आणावा, अशी मागणीही ठरावात करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर चीनबरोबर झालेल्या बैठकीत युरोपीय महासंघाने स्वीकारलेली आक्रमक भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरते.

सोमवारी युरोपीय महासंघ व चीनच्या प्रमुख नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा झाली.चर्चेत महासंघाकडून अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन व चार्ल्स मिचेल आणि चीनकडून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान ली केकियांग सहभागी झाले होते. यावेळी महासंघाच्या नेत्यांनी कोरोनाची साथ आणि चीनबरोबरील व्यापार व गुंतवणूकीसह हॉंगकॉंगच्या मुद्द्यावरही आग्रही भूमिका मांडली.

‘हाँगकॉंगचा मुद्दा युरोपीय महासंघासाठी तीव्र चिंतेचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर महासंघ सातत्याने जी७ देशांच्या संपर्कात आहे. चीनच्या नेतृत्वाने हॉंगकॉंगमध्ये लागू करण्यात येणाऱ्या कायद्याबाबत फेरविचार करावा. चीनने हॉंगकॉंगमध्ये कायदा लागू करण्यासाठी पुढे पावले टाकली तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे महासंघाच्या नेत्यांनी बजावले. हॉंगकॉंग बरोबरच कोरोनाच्या मुद्द्यावर चीनकडून सुरू असलेला खोटा प्रचार आणि युरोपियन कंपन्यांना चीनमध्ये येणाऱ्या अडचणी यावरही महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

यापूर्वी, अमेरिकेने सुरू केलेले व्यापारयुद्ध व ‘५जी’ तंत्रज्ञांनावरून चीनविरोधात सुरू केलेली मोहीम; या मुद्द्यांवर युरोपिय महासंघाने चीनबरोबर सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र उघुरवंशीयांवरील अत्याचार आणि त्यानंतर कोरोना व हॉंगकॉंगवरून युरोप-चीन संबंधांमध्ये असणारा तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनच्या ‘५जी’ तंत्रज्ञांनावरून युरोपियन देशांमध्ये असणारे मतभेदही समोर आले असून त्यात युरोपियन कंपन्यांना चीनमध्ये मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीची भर पडली आहे.

महासंघाच्या प्रमुख नेत्यांनी चीनच्या नेतृत्वाबरोबर झालेल्या चर्चेत हॉंगकाँगच्या मुद्यावर लावलेला धमकीचा सूर आणि इतर मुद्द्यांवर घेतलेली आक्रमक भूमिका, युरोप-चीन संबंध पुढील काळात अधिकच चिघळतील, असे संकेत देत आहेत. गेल्या काही काळात चीनने अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या आघाडीच्या देशांविरोधात विविध पातळ्यांवर संघर्ष सुरू केला आहे. अशा स्थितीत युरोपही चीनच्या विरोधात गेल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन चांगलाच कोंडीत सापडण्याची शक्यता दिसत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info