नातांझ अणुप्रकल्पातील आगीने मोठे हानी झाल्याची इराणची कबुली

नातांझ अणुप्रकल्पातील आगीने मोठे हानी झाल्याची इराणची कबुली

तेहरान – गेल्या आठवड्यात नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या संशयास्पद आगीने इराणच्या या प्रकल्पाचे मोठे नुकसान केले आहे. या आगीमुळे प्रगत सेंट्रीफ्यूजेसच्या निर्मितीची प्रक्रिया लांबणीवर पडल्याची कबुली इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये संशयास्पद स्फोटांची मालिका सुरू असून यामागे इस्रायल असल्याचा आरोप कुवैती वर्तमानपत्राने केला होता. तर इराणनेही इस्रायलला भीषण परिणामांची धमकी दिली होती. मात्र, याच्या पलिकडे जाऊन कुणीही या स्फोटाबाबत अधिक माहिती द्यायला तयार नाही.

नातांझ अणुप्रकल्प

गेल्या गुरुवारी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात आगीचा मोठा भडका उडाला होता. प्रकल्पाच्या आवारात ही आग लागल्याची माहिती इराणने दिली होती. मात्र, पाश्चिमात्य माध्यमांनी सदर अणुप्रकल्पातील हानीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केल्यानंतर इराणला याबाबतची खरी माहिती प्रसिद्ध करणे भागच पडले आहे. इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी रविवारी माध्यमांना दिलेल्या माहितीत, सदर प्रकल्पातील एका महत्त्वाच्या प्रयोगशाळेत ही आग पेटल्याचे सांगितले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे प्रकल्पाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे कमालवंदी म्हणाले.

सदर प्रयोगशाळेच्या इमारतीत सेंट्रीफ्यूजेसचे ‘असेंबली सेंटर’ होते. लवकरच प्रगत सेंट्रीफ्यूजेसच्या निर्मितीसाठी या इमारतीत नवी यंत्रणा बसवण्यात येणार होती. पण त्याआधीच घडलेल्या घटनेमुळे आता प्रगत सेंट्रीफ्यूजेसची निर्मिती लांबणीवर पडणार असल्याचे कमालवंदी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या आगीचे मुख्य कारण उलगडले असून राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती जाहीर केली जाणार नाही, असे कमालवंदी म्हणाले. इराणच्या अणुकार्यक्रमामध्ये नातांझचा अणुप्रकल्प सर्वाधिक महत्त्व असल्याचे मानले जाते. या अणुप्रकल्पात विकसित केल्या जाणाऱ्या प्रगत सेंट्रीफ्यूजेसचचा वापर इराण अणुबॉम्बसाठी करीत असल्याचा आरोप अमेरिका आणि इस्रायल करीत आहे.

२०१८ साली अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणने नातांझ अणुप्रकल्पातील सेंट्रीफ्यूजेसची संख्या वाढविण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर या अणुप्रकल्पातील सेंट्रीफ्यूजेसचे फोटोग्राफ प्रसिद्ध करून इराणने युरोपीय देशांना धमकावले होते. यामध्ये ‘आयआर-८’ या अतिप्रगत सेंट्रीफ्यूजेसचा समावेश होता. नातांझ अणुप्रकल्पातील या प्रगत सेंट्रीफ्यूजेसचा दाखला देऊन इस्रायलने पाश्चिमात्य देशांना सावध केले होते. सदर अणुप्रकल्पातील घडामोडी इराणला अणुबॉम्बच्या निर्मिती जवळ नेणार्‍या आहे, याची जाणीव इस्रायलने करुन दिली होती. तसेच जगाच्या नकाशावरुन इस्रायलला पुसून टाकण्याची घोषणा करणाऱ्या इराणच्या हाती अणुबॉम्ब आल्यास इस्रायलचे अस्तित्व धोक्यात येईल. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत इस्रायल इराणला अणुबॉम्ब मिळू देणार नाही, असे इस्रायलच्या नेतृत्त्वाने वेळोवेळी बजावले होते. यासाठी कुठलेही मोल चुकते करायची इस्रायलची तयारी आहे, असे इस्रायली नेत्याने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर इराणच्या अणुप्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या या दुर्घटनेमागे इस्रायल असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

नातांझ अणुप्रकल्प

८० च्या दशकात इराकचे तत्कालिन हुकुमशहा सद्दाम हुसेन यांनी अणुबॉम्ब निर्मितीचे प्रयत्न सुरू केले होते. पण १९८१ साली इस्रायलच्या लढाऊ विमानांनी उभ्या रहात असललेल्या इराकच्या या ओसिराक अणुप्रकल्पावर घणाघाती हवाई हल्ले चढविले होते. यामुळे हा प्रकल्प नष्ट झाला. २००७ सालीही इस्रायलने सिरियाचा अणुप्रकल्प प्राथमिक अवस्थेत असतानाच हवाई हल्ल्याद्वारे उध्वस्त केला होता. त्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पावरही इस्रायल अशीच कारवाई करू शकतो, असा दावा जगभरातील विश्लेषक करीत होते. तर अण्वस्त्रसज्ज इराणला विरोध करणारे सौदी अरेबिया आणि इतर आखाती देश इस्रायलला आपली हवाईहद्द मोकळी करून देतील, असेही बोलले जात होते. त्यातच २०१० साली इराणच्या नातांझ आणि बुशहेर अणुप्रकल्पावर स्टक्सनेटचा सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पातील हजारो सेंट्रीफ्यूजेस निकामी होऊन इराणचा अणुकार्यक्रम काही वर्षांसाठी पिछाडीवर गेला होता. इराणने या सायबर हल्ल्यांसाठी इस्रायली गुप्तचर संघटना मोसाद आणि अमेरिकेला जबाबदार धरले होते.

आताही इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पाला लक्ष्य करीत असेल तर त्याचे भयंकर परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, अशी धमकी इराणने दिली आहे. मात्र इस्रायल आपल्या शत्रूदेशातील कारवायांची वाच्यता करीत नाही, असे सुचक उद्गार काढून इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले आहे. मात्र पुढच्या काळात इराण इस्रायलला वेगवेगळ्या मार्गाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्या वाचून राहणारा नाही, असे संकेत मिळू लागले आहेत. त्याचवेळी इराणकडून असलेला हा धोका लक्षात घेऊन त्याला तोंड द्यायची जय्यत तयारी इस्रायलने केल्याचे स्पष्ट होत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info