तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तान सोडण्यासाठी जीवघेणी चढाओढ सुरू झाली

काबुल विमानतळावरील दुर्दैवी घटनांमध्ये सात जणांचा बळी

काबुल – तालिबानच्या क्रूर राजवटीच्या दहशतीमुळे भेदरलेल्या अफगाणींनी शक्य त्या मार्गाने हा देश सोडून जाण्याची तयारी केली आहे. दुसऱ्या देशात प्रवेश मिळावा, यासाठी अफगाणी आपल्या जीवाची बाजी लावायला तयार झाले आहेत. काबुलमधील विमानतळावर यासाठी बेफाम गर्दी उसळली होती. अमेरिकी विमानात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी अमेरिकी जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच जण दगावले आहेत. तर अफगाणिस्तान सोडणाऱ्या विमानात जागा मिळाली नाही, म्हणून विमानाच्या चाकावरून प्रवास करू पाहणाऱ्या दोघा जणांचा विमान हवेत असताना कोसळून करुणाजनक अंत झाला. ही एकच बाब अफगाणिस्तानातील विदारक परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी पुरेशी ठरेल.

तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मुल्ला बरादर याने रविवारी आपल्या साथीदारांना लुटमार न करण्याचे आदेश दिले होते. पण तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात लुटमार, महिलांचा छळ सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अफगाणींनी स्वसंरक्षणासाठी ठेवलेल्या बंदुका, रायफल्सही तालिबान्यांनी ताब्यात घेतल्या. तर राजधानी काबुलमधील राष्ट्राध्यक्ष निवास, संसदेची इमारत, अंतर्गत सुरक्षा मंत्रालय यामध्ये तालिबानचे दहशतवादी घुसल्याचे समोर येत आहेत. अफगाणिस्तानातील सर्वात मोठा बागराम हवाईतळ ताब्यात घेऊन तेथील आपल्या हजारो साथीदारांची तालिबानने सुटका केली.

अफगाणिस्तानातील सोशल मीडियावर तालिबानच्या या क्रौर्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ समोर आल्यामुळे घाबरलेल्या अफगाणींनी काबुल विमानतळाकडे धाव घेतली. त्यातच तालिबानने प्रवासी विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातल्यामुळे अफगाणींमधील भीती अधिकच वाढली. पाहिजे तितके पैसे घ्या पण आम्हाला अफगाणिस्तानातून बाहेर काढा, अशी विनवणी अफगाणी नागरिक विमानतळांवरच्या अधिकाऱ्यांना करीत आहेत.

रविवारी रात्री काही अफगाणींनी अमेरिकी लष्कराच्या विमानात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमेरिकी लष्कराने केलेल्या गोळीबारात पाच अफगाणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी अमेरिकेसाठी रवाना होणाऱ्या लष्करी विमानावर स्वार होण्याचा तसेच चाकावरुन प्रवास करण्याचा प्रयत्नही काही अफगाणींनी केला. या प्रयत्नात किती जणांना यश मिळाले, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण विमान हवेत असताना चाकावर लटकलेले दोन अफगाणी खाली कोसळले. या घटनेनंतरही जीवावर उदार होऊन हजारो अफगाणी काबुल विमानतळावर ठाण मांडून बसले आहेत.

असे असले तरी अफगाणिस्तानच्या संपूर्ण भूभागावर तालिबानने कब्जा केलेला नाही. अजूनही अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील पंजशीर प्रांत स्वतंत्र आहे. दोन दशकांपूर्वी तालिबानच्या राजवटीविरोधात लढा देणाऱ्या अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद याची येथे सत्ता आहे. त्यामुळे येत्या काळात तालिबान पंजशीरवर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, तालिबानच्या राजवटीने भेदरलेल्या अफगाणींसाठी बडतर्फ उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी संदेश दिला. ‘कधीही, कुठल्याही परिस्थितीत मी तालिबानसमोर झुकणार नाही. माझे आदर्श अहमद शाह मसूद यांच्या मुल्यांशी मी कधीही विश्‍वासघात करणार नाही. माझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांना मी निराश करणार नाही. तालिबानशी कधीच समेट होणार नाही’, असे सांगून सालेह यांनी तालिबानविरोधात दंड थोपटले आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info