Breaking News

थायलंडच्या नकाराने चीनचे सामरिक इरादे धुळीस मिळाले

बँकॉक – थायलंड सरकारने चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा भाग असणारा ३० अब्ज डॉलर्सचा ‘क्रा कॅनल प्रोजेक्ट’ रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ चीनकडून घेण्यात येणाऱ्या दोन पाणबुड्यांचा करारही तात्पुरता स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आहे. थायलंडचे हे निर्णय चीनला आर्थिक तसेच सामरिक पातळीवर बसलेला मोठा धक्का मानला जातो. काही दिवसांपूर्वीच म्यानमारने ‘चायना म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉर’च्या( सीएमईसी) अनेक प्रकल्पांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही चिनी कंपन्यांबरोबरील करार रद्द करण्याचे संकेत दिले होते.

‘क्रा कॅनल प्रोजेक्ट’ हा केवळ आर्थिकच नाही तर सामरिकदृष्टयाही चीनसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. चीनचा बहुतांश व्यापार अजूनही सागरी वाहतुकीवर अवलंबून असून, त्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा भाग असलेली ‘मलाक्काची सामुद्रधुनी’ हा मुख्य आधार ठरतो. इंडोनेशिया, मलेशिया व सिंगापूर या तिन्ही देशांच्या सागरी हद्दीचा भाग असणारी ही सामुद्रधुनी, हिंदी महासागर व पॅसिफिक महासागराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मार्ग रोखून धरण्याची क्षमता अमेरिका व भारताकडे आहे. चीनकडून भारताच्या नियंत्रणरेषेवर कुरापती सुरू असताना मलाक्काच्या सामुद्रधुनीत युद्धनौका तैनात करून भारताने चीनला इशारा दिला होता.

त्यामुळे या मार्गाला पर्याय म्हणून चीनने थायलंडमध्ये सुमारे ३० अब्ज डॉलर्स खर्चाचा ‘क्रा कॅनल प्रोजेक्ट’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. १२० किलोमीटर लांबीच्या या कालव्यामुळे चीनच्या जहाजांना मलाक्काच्या सामुद्रधुनीतुन घालावा लागणारा तब्बल ७०० मैल लांबीचा वळसा वाचला असता, असे सांगण्यात येते. त्याचवेळी चीनच्या युद्धनौकांना ‘साऊथ चायना सी’मधून थेट हिंदी महासागरात उतरण्याचा मार्गही उपलब्ध झाला असता. थायलंडमधील हा प्रस्तावित चिनी ‘क्रा कॅनल प्रोजेक्ट’ म्हणजे गेल्या दोन शतकात सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्ग ठरलेल्या ‘सुएझ कालवा’ व ‘पनामा कालवा’ यांच्या तोडीस तोड असल्याचेही मानले जात होते.

त्यासाठी चीनकडून थायलंडमध्ये जोरदार लॉबिंगही करण्यात आले होते. मात्र विरोधी पक्ष व स्थानिक जनतेकडून होणाऱ्या प्रचंड विरोधाच्या पार्श्वभूमीवर थायलंड सरकारला हा प्रकल्प रद्द करणे भाग पडले आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात पाठोपाठ चीनकडून पाणबुड्या घेण्याचा निर्णयही थायलंड लांबणीवर टाकला. एकाच वेळी बसलेले हे दोन दणके चीनचा प्रभाव क्षेत्राला बसलेला मोठा हादरा ठरतो. मलेशिया, म्यानमार व त्यापाठोपाठ थायलंडने चीनला दिलेला स्पष्ट नकार म्हणजे आग्नेय आशियातील चीनचा दबदबा संपल्याचे संकेत आहेत, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी मलेशियाने चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा भाग असणारे अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प रद्द केले होते. त्यानंतर आता म्यानमार व थायलंडने घेतलेल्या निर्णयांमुळे चीनचे सामरिक इरादे धुळीस मिळताना दिसत आहेत. थायलंडने रद्द केलेला ‘क्रा कॅनल प्रोजेक्ट’ ही चीनची ‘आसियन’ देशांमधील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणून ओळखण्यात येत होती.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info