Breaking News

‘साऊथ चायना सी’वरून युरोपची चीनविरोधात आक्रमक भूमिका – जर्मनी, फ्रान्स व ब्रिटनचे संयुक्त राष्ट्रसंघटनेला निवेदन

against China

लंडन/बीजिंग, दि. २५ – साऊथ चायना सीवर चीनकडून सांगण्यात येणारा कथित ऐतिहासिक अधिकार आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून नसून, सागरी क्षेत्रातील वाहतुकीचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे, या शब्दात युरोपने चीनला सुनावले आहे. युरोपमधील तीन आघाडीचे देश असणाऱ्या(बिग थ्री) जर्मनी, फ्रान्स व ब्रिटनने संयुक्त राष्ट्रसंघटनेला दिलेल्या निवेदनात ही भूमिका घेतली असून, या देशांनी एकत्रितरित्या चीनला बजावण्याची ही पहिलीच वेळ ठरते. या निवेदनामुळे युरोपिय देशांची चीनविरोधातील तीव्र नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून दोन बाजूंमधील वाढता दुरावा अधिक ठळकपणे समोर आला आहे. व्यापारयुद्ध व कोरोनासहित इतर मुद्यांवरून अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक संघर्ष छेडला असतानाच युरोपने दिलेला नवा धक्का चीनसाठी जबरदस्त हादरा ठरतो.

चीनबरोबरील संबंधांच्या मुद्द्यावर अमेरिका व युरोपमध्ये मतभेद असल्याचे वारंवार समोर आले होते. मात्र कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली असून युरोपातही चीनविरोधातील असंतोष तीव्र होत आहे. कोरोनाच्या साथीची चीनच्या सत्ताधारी राजवटीने केलेली हाताळणी आणि त्याचवेळी हॉंगकॉंग तसेच उघुरवंशीयांबाबत घेतलेले निर्णय युरोपमधील नाराजीचे प्रमुख कारण ठरले आहे. चीनबरोबरील संबंधांच्या मुद्द्यावर युरोपीय महासंघाने दिलेले इशारे तसेच आवाहनही चीनने धुडकावून लावल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर युरोपच्या ‘बिग थ्री’ देशांनी साऊथ चायना सीच्या मुद्यावर चीनला दिलेली चपराक लक्ष वेधून घेणारी ठरते.

आपल्या निवेदनात युरोपिय देशांनी ‘१९८२ यूएन कन्व्हेंशन ऑन द लॉ ऑफ द सी’चा उल्लेख केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या या चौकटीत घेतलेल्या निर्णयांचा आदर राखायला हवा, असे बजावण्यात आले आहे. अमेरिकेकडून सातत्याने मांडण्यात येणाऱ्या ‘फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन’च्या मुद्यावरही निवेदनात भर देण्यात आला आहे. हे तिन्ही देश ‘१९८२ यूएन कन्व्हेंशन ऑन द लॉ ऑफ द सी’चा भाग असल्याने त्यांच्या निवेदनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापुर्वीही युरोपिय देशांनी साऊथ चायना सीच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली असली तरी चीनला थेट शब्दात फटकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेने साऊथ चायना सीच्या मुद्यावर आपले धोरण जाहीर करून चीनचे कोणतेही दावे मान्य करणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही आपले धोरण मांडताना अमेरिकेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. चीनने या देशांना प्रत्युत्तर देताना साऊथ चायना सी आपला सार्वभौम हिस्सा असल्याचा दावा केला होता. युरोपिय देशांनाही चीनकडून असेच उत्तर मिळण्याची शक्यता असली तरी युरोपकडून व्यक्त झालेली नाराजी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला जबर हादरा ठरतो, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात आला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info