बिडेन यांचा विजय म्हणजे चीनचा अमेरिकेवरील विजय ठरेल – डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

बिडेन यांचा विजय म्हणजे चीनचा अमेरिकेवरील विजय ठरेल – डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘जो बिडेन यांनी चीनच्या जागतिक व्यापार संघटनेतील प्रवेशाला समर्थन दिले होते. ही गोष्ट अमेरिकेसाठी मोठी आपत्ती ठरली. चीनने कायम आपण विकसनशील देश असल्याची पळवाट वापरली. मात्र यापुढे हे होणार नाही. जर बिडेन जिंकले तर चीन जिंकेल. बिडेन विजयी झाले तर अमेरिकेवर चीनचा ताबा असेल’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. यावेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या साथीवरून चीनला धारेवर धरताना, चीननेच ही साथ जगभर फैलावली, असा आरोपही केला. चीन आपल्या पाठीराख्यांमार्फत अमेरिकेवर प्रभाव टाकीत असल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनविल्याचे दिसत आहे.

बिडेन

पुढील महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असून, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनविरोधातील भूमिका अधिक आक्रमक केली आहे. ‘चीनच्या राजवटीने देशातील इतर भागांमध्ये कोरोनाची साथ पसरू नये म्हणून प्रयत्न केले. मात्र त्याचवेळी अमेरिका व युरोपसह जगाच्या इतर भागात साथीचा फैलाव रोखण्यासाठी काहीच केले नाही. अमेरिकेत कोरोनामुळे जी भयानक स्थिती दिसते आहे, त्यासाठी चीनच जबाबदार आहे’, अशा शब्दात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले. कोरोनामुळे अमेरिकेचे जे काही आर्थिक नुकसान झाले आहे, त्याची भरपाईदेखील चीनकडूनच वसूल केली जाईल, असेही त्यांनी बजावले.

बिडेन

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ८० लाखांनजीक पोहोचली असून, दोन लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेत चीनविरोधात असंतोष वाढत असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही चीनविरोधातील संघर्षाची तीव्रता वाढवली आहे. कोरोनाच्या मुद्यावरून लक्ष्य करतानाच हॉंगकॉंग व चिनी कंपन्यांचा अमेरिकेतील प्रभाव रोखण्यासाठी नव्या कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हॉंगकॉंगमधील बँका व इतर वित्तसंस्थांना नव्या निर्बंधांचा इशारा दिला आहे. त्याचवेळी चीनच्या ‘अलिबाबा’ या बड्या कंपनीचा भाग असणाऱ्या ‘अँट फायनान्शियल’ या कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

बिडेन

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा अमेरिकेला असलेला धोका हे वास्तव असल्याची टीका केली आहे. यापूर्वीच्या अमेरिकी राजवटींनी कम्युनिस्ट पार्टीला अमेरिकेतील सर्व क्षेत्रात मोकळीक दिली, असा ठपकाही त्यांनी ठेवला. चीनच्या सत्ताधारी पक्षाकडून अमेरिकेत येणारा पैसा, या देशातील लोकशाही कमकुवत करण्यासाठी वापरला जातोय, याची जाणीव आपण ठेवायला हवी, असेही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ म्हणाले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info