मालीतील फ्रान्सच्या हवाईहल्ल्यात ‘अल कायदा’चे ५० हून अधिक दहशतवादी ठार

मालीतील फ्रान्सच्या हवाईहल्ल्यात ‘अल कायदा’चे ५० हून अधिक दहशतवादी ठार

पॅरिस/बमाको – फ्रान्सने मालीत चढविलेल्या हवाईहल्ल्यामध्ये ‘अल कायदा’चे ५० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. आफ्रिकेच्या ‘साहेल’ क्षेत्रात फ्रान्सकडून सुरू असणाऱ्या ‘ऑपरेशन बरखाने’अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी दिली. फ्रान्ससह युरोपमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते. फ्रान्सचा हा हवाईहल्ला म्हणजे फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत.

दहशतवादी ठार

गेल्या आठवड्यात मध्य मालीसह नायजर व बुर्किना फासो या देशांच्या सीमेनजीक फ्रान्सने हवाईहल्ले चढविले. ‘मिराज जेट्स’ व ड्रोन्सच्या सहाय्याने केलेल्या या कारवाईत ५०हून अधिक दहशतवादी मारले गेले, अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी दिली. या कारवाईत काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. मालीतील कारवाई अल कायदाला मोठा धक्का देणारी असल्याचा दावाही फ्रेंच मंत्र्यानी केला आहे.

दहशतवादी ठार

गेल्या काही वर्षांपासून पश्चिम आफ्रिकेच्या ‘साहेल’ भागात दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. २०१२ मध्ये, उत्तरी माली येथे दहशतवादी गटांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. ही बंडखोरी अयशस्वी ठरली होती. परंतु त्यानंतर आलेल्या अस्थिरतेचा फायदा दहशतवादी गटांनी घेतला आहे. ‘आयएस’ आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी गटांनी माली, नायजर, बुर्किना फासो आणि नायजेरियाच्या सैन्यावर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. या हल्ल्यांमध्ये ५०० हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. या संघर्षात साहेल क्षेत्रात तैनात असणाऱ्या फ्रेंच लष्करानेही आपले अनेक जवान गमावले आहेत.

त्यामुळे फ्रान्सदेखील आक्रमक झाला असून, गेल्या काही महिन्यांत दहशतवादविरोधी कारवायांची गती वाढली आहे. त्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अतिरिक्त लष्करी तैनातीची घोषणाही केली होती. फ्रान्सबरोबरच अमेरिका व इतर युरोपिय देशांनीही साहेल क्षेत्रातील दहशतवादविरोधी मोहिमेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info