व्हिएतनामजवळ क्षेपणास्त्र तळ उभारून चीन युद्धाची तयारी करीत आहे – अमेरिकी विश्‍लेषकाचा दावा

व्हिएतनामजवळ क्षेपणास्त्र तळ उभारून चीन युद्धाची तयारी करीत आहे – अमेरिकी विश्‍लेषकाचा दावा

तैपेई/हानोई – व्हिएतनामच्या सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर चीनने क्षेपणास्त्रांची जमवाजमव सुरू केली आहे. चीनची ही तयारी शेजारी देशांसाठी इशाराघंटा ठरत आहे. येत्या काळातील युद्धासाठी चीनने ही तैनाती केलेली आहे, असा दावा अमेरिकी अभ्यासगटाच्या विश्‍लेषकाने दिला. काही महिन्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते, याची आठवणही या विश्‍लेषकाने करून दिली.

व्हिएतनामच्या सीमेजवळील चीनच्या गुआंशी भागात चीनने क्षेपणास्त्र तळ उभारण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या गेल्या काही आठवड्यांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. या व्यतिरिक्त व्हिएतनामच्या सीमेपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणखी एका क्षेपणास्त्र तळाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही समोर आले होते. जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रडार्स आणि सहा लाँचर्स या तळावर तैनात होते. व्हिएतनामच्या सरकारने या बातम्यांची सत्यता तपासून पाहिली जात असल्याचे म्हटले होते.

‘एशिया-पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडिज्’ या अभ्यासगटातील विश्‍लेषक अ‍ॅलेक्झांडर वुविंग यांनी व्हिएतनामच्या सीमेजवळील या क्षेपणास्त्र तळांबाबत इशारा दिला. या क्षेपणास्त्र तळांपासून फक्त व्हिएतनामच नाही तर इतर शेजारी देशांनाही धोका असल्याचे वुविंग यांनी सांगितले. ‘चीन युद्धाची तयारी करीत असल्याचे संकेत या क्षेपणास्त्र तळांच्या उभारणीवरुन मिळत आहेत. हे युद्ध लगेच आज किंवा उद्या होणार नाही. पण नजिकच्या काळात चीन नक्कीच युद्ध पुकारेल’, असा दावा वुविंग यांनी केला.

गेल्या कित्येक वर्षांपासून व्हिएतनामबरोबरचा सीमावाद आणि ‘साऊथ चायना सी’चा वाद या युद्धाचे कारण ठरू शकते. 1974 सालच्या युद्धात व्हिएतनामच्या कम्युनिस्ट राजवटीने चीनच्या राजवटीला जेरीस आणले होते. चीनमध्ये आजही त्याचा राग असल्याचे वुविंग म्हणाले. या व्यतिरिक्त ‘साऊथ चायना सी’च्या वादातही व्हिएतनाम चीनला चांगलीच टक्कर देत आहे.

या वादाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिएतनामने या सागरी क्षेत्रातील स्प्रार्टले द्विपसमुहातील वेस्ट रिफ आणि सिन कोए बेटांवरील तटबंदी मजबूत केली तसेच पायाभूत सुविधाही उभारल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारतींबरोबरच हेलिकॉप्टर्ससाठी हेलिपॅड्स, बंकर्स तसेच कम्युनिकेशन टॉवर्स व्हिएतनामने उभारल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर या क्षेत्रातील इंधनाच्या उत्खननासाठी व्हिएतनाम भारत, ऑस्ट्रेलियासारख्या देशांना आमंत्रित करीत आहे. यामुळे चीन अधिकच संतापला आहे.
अशा परिस्थितीत चीनने व्हिएतनामच्या सीमेजवळ क्षेपणास्त्रे तैनात करून या देशावर लष्करी दडपण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा माध्यमे करीत आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info